मागे वळून बघताना... पण कशाला बघायचं मागे वळून? अनुभवातून गाळून आलेला अर्क भिनलेला असतो मेंदूत. नव्या वाटा तुडवायला तयार झालेलं असतं मन. नवी नजर दाखवून देते एक वेगळी संधी. हातात आलेली असते अनोखी ताकद, पाय वळू पहातात नव्या दिशेला. यशापयशाची चिंता नुरलेली असते.
ब्रदरचा फोन येतो, "सर, एक पेशंट आहे. जरा बोला त्याच्याशी. भयाक्रांत आहे. उपचार नुकतेच सुरू झालेत." मी बोलतो. रिअर मिरर मधे बघून माझ्या सत्य नारायणाची कथा सांगतो. वादळाचे वर्णन करतो, जोरात हेलकावे खाणाऱ्या नौकेवर ठेवलेल्या विश्वासाबद्दल प्रामाणिकपणे सांगतो, मजबूत सुकाणूवर असलेल्या श्रद्धेबाबत बोलतो.
दूरवर अंधुक दिसणाऱ्या दीपस्तंभामुळे पाय ठामपणे ठेवायला जमीन मिळणारच ही प्रचंड आशा... तिच्यावर भरभरून बोलतो. पेशंट थम्सअप करतो... मी भरून पावतो.