मी एक झाड पाहिले, शब्दांनी रसरसलेले , मातीतून उगवून आठवणींच्या, आकाशाला भिडलेले ..
मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८
रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८
शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८
जीवघेणे गात आहे
हे कुणी जे आत आहे
जीवघेणे गात आहे ...
व्यस्त ते व्यापात त्यांच्या
लाघवी पण नात आहे...
रोज खाते माणसाला
माणसाची जात आहे ...
कोरडा व्यवहार रात्री
हे मनाला खात आहे ...
मित्र होता सोबतीला
वाटले ना घात आहे...
जावयाला पेच मोठा
जे नको.. ताटात आहे ...
तो नव्या रूपात नक्की
ही इथे बघ कात आहे ...
वाढवावी गस्त आता
नागरी उत्पात आहे...
- श्रीधर जहागिरदार
१६/११/२०१८
सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८
गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८
फुंकर
जखमा भरत नसतात
पण म्हणून फुंकर घालायचीच नाही ?
वास्तू पाडून एक भक्कम भिंत
उभारली गेली, रंगवली गेली
लाईफ टाइम गॅरण्टीच्या संशयानं ...
कोवळ्या पानांना पडू लागली
भयग्रस्त स्वप्नं, रक्तचिंब लाल फुलांची,
आणि फुलांना खुपू लागले काटे
निरागस वाऱ्यासंगे खेळताना ...
एका सकाळी तुला घेऊन गेलेलो
समुद्रावर,
फारसं कुणी नव्हतं, एक निरागस एकटीच
मन लावून बनवत होती वाळू किल्ला.
मन लावून बनवत होती वाळू किल्ला.
"खेळ तिच्याशी"
मिनिटांत परतलिस, विचारलंस
"ती त्यांच्यातली आहे, चालेल मी खेळली तर?"
"ही वाळू,
हा समुद्र,
हे आकाश,
हा वारा.
ते ठरवून खेळत नाहीत याच्याशी किंवा मग फक्त तिच्याशी.
सारे देत असतात आनंद तुला, तिला
तसाच निरागस आनंद देता घेता यायला हवा तुला."
जखमा भरत नसतात
पण म्हणून फुंकर घालायचीच नाही ?
- श्रीधर जहागिरदार
बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८
मी तू
या वाढलेल्या गदारोळात
तुझा गिल्ट वाढलेला असणार
रडला होतास तू
धुमसून धुमसून
आणि मीच शांतवलं होतं तुला
थोपटून थोपटून
मधले सारे पूल वाहून गेलेत, आता
तुझं तुलाच समजून घ्यावं लागणार
नो म्हणजे नो असलं
तरी हो म्हणजे होच असायला हवं
हे मी तू समजून घेतलं होतं तेंव्हा.
समजून घेऊ आजही !!
-श्रीधर जहागिरदार
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)