रविवार, ४ ऑक्टोबर, २००९

दोन कणिका



अंधार चिरायला,
पुरे असतो एक काजवा ;
जीव जाळायला
खूप होतों अश्रु हळवा।

माझं रडणार दु:ख 
निजलय 
घेउन अफूची गोळी,
एका अंगाई अभावी।

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

धुक्याच्या वयात


धुक्याच्या वयात,
मनात खुलतात, बाहेर फुलतात, फक्त गर्द गुलमोहर,
तप्त ऊन, बाभुळ काटे, सारे सारे, सारे मनोहर।

धुक्याच्या वयात,
दिवस देखील रात्र होतो, मनाकाठी, स्वप्नासाठी,
किती किती फुले फुलतात हुरहुरत्या गंधापाठी।

धुक्याच्या वयात,
हरपते भान, उरते तान, सुर भारला आणि गळा 
नाते तुटते, जमीन सुटते, आकाश भोर फक्त झुला।

धुक्याच्या वयात,
माझे असे काहीच नाही, सारे सारे तुझ्यासाठी,
प्रचंड असा विश्वास माझा, माझे आकाश माझ्यापाठी।

धुक्याच्या वयात, 
निःशब्द नीळे, निर्मळ तळे, सर्वदूर पसरून असते,
सारे स्वच्छ पारदर्शक, कुठे कुठे धुके नसते।

- श्रीधर जहागिरदार

बुधवार, ८ जुलै, २००९

टेडी बियर आणि चिमणी

आपल्या दु:खाचा टेडी बियर कवटाळून
झोपी जातेस रोज रात्री ,
मग पहाटे पहाटे खिडकीपाशी
चिवचिवणारी सुखाची चिमणी
बघणार कशी अन ऐकणार कशी?

मंगळवार, ९ जून, २००९

वंचना

वांझ या जखमा अशा यांत नाही वेदना
या मनाच्या कां कळेना मोडल्या संवेदना ..

देत धड़का येत लाटा हा किनारा मौन कां
वादळे विंधुन गेली पण कशी ती खंत ना ..

पेटले आकाश जळल्या कोवळ्या त्या चांदण्या
सूर्य झाला भ्रष्ट तरीही या दिशांना भान .ना ...

दाटले दहिवर हे ओले पण कळी ना डोलली
सुर-रंगी ह्या थव्यांचा फांदीला तो नाद ना ...

हासलो तर भासले पाषाण शिल्पच हासले
दाटले डोळ्यात पाणी ते असे क्षाराविना ...

चालतो हा श्वास आहे कां म्हणु मी प्राण हा
ह्या जिण्याची कां अशी ही जाहली रे वंचना ...

शुक्रवार, २२ मे, २००९

मोरपंखी क्षण

अनोख्या वेषात, फुलांच्या देशात जाणार तू,
रंगाची खैरात, गंधाच्या स्वरात गाणार तू।


क्षितिज कडा, स्वप्नांचा सडा घालणार तू,
ह्ळुवार जग, पायघडी ढग चालणार तू।


आकाश खुळा, आनंद झुला झुलणार तू,
मनाची कळी, पाकळी पाकळी फुलणार तू।


नाहीजरी थेंब, चांदण्यात चिंब भिजणार तू,
मोरपंखी क्षण, मोहरे कण कण सजणार तू।


अबोल हुंकार, स्पर्शाचा झंकार, डोलणार तू,
मनाची बोली, स्पर्शाची ओली, बोलणार तू।


पापणीत स्वप्न, जगण्यात मग्न, असणार तू,
आसुसली दिठी, बेभान 
मिठी, तुझी न रहाणार तू।

शनिवार, २ मे, २००९

अनुभूति


मेंदूवर सांचलेली वाळवंट
पसरताहेत हळूहळू मनापर्यंत ...

किती काळ जपशील चार थेंब
भावनांचे, ओसाड रेताडास फुटलाच, तर
फुटेल कोंब निवडुंगाचा अन
तुझ्या आत्म्याची लक्तरं
फडकावतील तुझ्या अपयशाची गाथा ...

पण ह्याची शक्यताही कमीच !
कारण कुठल्याही गाथेचा नायक
होण्याइतका मोठा नाहीस तू ...
ह्या वैराणात तुझी नियती शहामृगाची!

वादळाच्या वासाने खुपसून घे मान
तुलाच गिळणारया वाळवंटात,
तुझ्या अस्थिंचेही होऊ देत वाळू कण
अन जा सामावून ह्या वाळवंटात
त्याचाच एक भाग होउन !

गुरुवार, ९ एप्रिल, २००९

संध्याकाळी


गहिवरले झाड़ अचानक
फुलून आली फुले,
बाकावरच्या म्हातारयाला
बघून फांदी झुले।
ओढ़ लागली घरट्याची
चिवचिवली पाखरे,
गोष्टिवेल्हाळ आजीभवती
शेजार्र्यांची मुले।