मंगळवार, ९ जून, २००९

वंचना

वांझ या जखमा अशा यांत नाही वेदना
या मनाच्या कां कळेना मोडल्या संवेदना ..

देत धड़का येत लाटा हा किनारा मौन कां
वादळे विंधुन गेली पण कशी ती खंत ना ..

पेटले आकाश जळल्या कोवळ्या त्या चांदण्या
सूर्य झाला भ्रष्ट तरीही या दिशांना भान .ना ...

दाटले दहिवर हे ओले पण कळी ना डोलली
सुर-रंगी ह्या थव्यांचा फांदीला तो नाद ना ...

हासलो तर भासले पाषाण शिल्पच हासले
दाटले डोळ्यात पाणी ते असे क्षाराविना ...

चालतो हा श्वास आहे कां म्हणु मी प्राण हा
ह्या जिण्याची कां अशी ही जाहली रे वंचना ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा