मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१२

माझ्या त्या साऱ्या कविता



झाल्या ना अजून लिहुनी, माझ्या त्या साऱ्या कविता,
वस्तीला वाऱ्या मधुनी, माझ्या त्या साऱ्या कविता...

आकाश विलासी झाले बघ  किती कल्पनापक्षी
चोचींत उडाले धरुनी, माझ्या त्या साऱ्या कविता...

शब्दांच्या खोल मनीचे छळतात जरी अर्थ तुला
बघ मनांत असतिल रुतुनी, माझ्या त्या साऱ्या कविता!

मी पेरत गेलो करुणा, शब्दांच्या शेतामधुनी,
शिंपित गेल्या अश्रु  तेंव्हा , माझ्या त्या साऱ्या कविता...

टोळ धाड आलेली, मळभ दाटले भवताली खिन्न,
अंतरास उजळे फिरुनी, माझ्या त्या साऱ्या कविता...

आंजर- गोंजर करत्या खोचक- बोचक नसत्या उक्त्या
वहीतच असत्या पडूनी , माझ्या त्या साऱ्या कविता...

माझ्याच बरोबर असुद्या, ह्या सरणावरती सुद्धा  
वस्तीला वाऱ्या मधुनी, माझ्या त्या साऱ्या कविता...

- श्रीधर जहागिरदार
२८-८-२०१२



बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

तू दिलेस जीवन मला नवे


ह्या परि आणखी काय हवे, तू दिलेस जीवन मला नवे

होतो जेव्हा शब्द निरर्थक, नव काव्यातील छचोर मुक्तक
तूच लावूनी अन्वय माझा दिलास मजला अर्थ सवे
ह्या परि आणखी काय हवे, तू दिलेस जीवन मला नवे .... 

मिटमिटता मी न काजवा, कुठे अंतरी सूर्य असावा ,
जाणीव  ही माझ्यात असावी, सूर्यफूल तू म्हणून व्हावे
ह्या परि आणखी काय हवे, तू दिलेस जीवन मला नवे ....   

माझ्या जीवनी निव्वळ काटे, व्यथित मनाला जेव्हा वाटे,
सावरण्या ह्या न्युनातून मज, तू गुलाब होऊन मधुर हसावे,
ह्या परि आणखी काय हवे, तू दिलेस जीवन मला नवे ....   

दीप तगावा माझा म्हणूनी, जळशी साजणी वात होऊनी 
ह्या परि आणखी काय हवे, तू दिलेस जीवन मला नवे .... 


----------------------------------------श्रीधर जहागिरदार 

(1972)

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१२

चारोळ्या

1.
थेंब थेंब साचत साचत
झाला कधीच डोह,
ठिणगी ठिणगी पेटत पेटत,
हुंकारे विद्रोह !!

2.
ओसरल्या आज किनारी
काळाच्या लाटा,
शोधत बसते मन बावरे
ओळखीच्या वाटा!

3.
आलोच आहे अवनीवर
तर ऋतू साहणे आले,
मैफिलीत सामील झालो,
म्हणून गाणे आले!

4,
जो क्षण जगावासा वाटतो 
तोच नेमका क्षणिक असतो,
उरल्या सुरल्या बाकींना 
जीवनभर स्मरीत  बसतो! 

5,
जो तो जपत असतो 
आपापली आवड,
सारेच उचलत नसतात 
आईबापाची कावड!

6.
मी एक झाड पाहिले,
शब्दांनी रसरसलेले ,
मातीतून उगुनी आठवणींच्या,
आकाशा भिडलेले ..

7.
ओसंडूनी न वाहतात 
आसवे काळजात थिजतात,
जिथे मैत्र जुळले तिथे  
आज कारस्थाने शिजतात ....

8.
प्राजक्ताचा गंधही येथे, 
पुरला माझ्या श्वासाला,  
कांचनाचा स्पर्श तोकडा 
भासे कुठल्या कायेला!

9.
देण्यासाठी हात केला, 
ओंजळ माझी होती रिती,
घेण्यासाठी हात किती, 
सारे जीव घायगुती!

10.
कशासाठी जगायचे,
हे होते उलगडले,
कुणासाठी जगायचे, 
तेथे सारे अवघडले!

11.
मोलाचे क्षण जगण्याचे
अफूत गेले,
भरजरी आयुष्य सुखाचे
रफूत गेले...

----श्रीधर जहागिरदार 

तळे




एक थेंब तळ्यामध्ये,
उठला तरंग....
मास्यांचे ना गाऱ्हाणे
किनारे कां भंग?

थेंब थेंब साचलेली
ही आकाशाची फुले,
किनारयांस उगा माज
तेच राखती तळे!

लपलेला रानामध्ये
हा चंद्राचा आरसा,
सापडला आहें कुणा
वाटेना फारसा !



--------- श्रीधर जहागिरदार 
१०-८-२०१२

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२

पहिले प्रेम-दुसरे प्रेम

 न सुटलेल्या समीकरणागत
सलते, छळते, पहिले प्रेम,
किती असु दे किंमत 'क्ष' ची, 
मिळते-जुळते दुसरे  प्रेम!

मोर पिसागत हळुवारसे
गळून पडते पहिले प्रेम, 
शून्यातून जग उभे कराया   
पुरून उरते दुसरे प्रेम!

अस्तित्वाचे भान, दिलासा  
जगण्यासाठी, पहिले प्रेम,
अर्थ कळावा ह्या जगण्याचा 
असा खुलासा दुसरे प्रेम!

- श्रीधर जहागिरदार 
२ आगस्ट २०१२