शुक्रवार, २३ जानेवारी, २०१५

फुलांचे दिलासे


इथे काळजाला घरे आजही
तुझे चाललेले बरे आजही ....

फुलांचे दिलासे असू दे तुला
इथे वेदनांचे झरे आजही….

जरी सत्य होते जगा ज्ञातसे
पुरावेच ठरती खरे आजही …

किती बोललो, हासलो केवढे
कुठे मौनलो ते स्मरे आजही ….

असे भेटलो, काय सांगू सखे
पहा …चंद्र डोही तरे आजही …

तनी कंटकाचाच शेला जरी
उरातील जपले गरे आजही ...

पुन्हा सैल केलास संभार तू !
जगू दे जरा, 'श्री' मरे आजही …

- श्रीधर जहागिरदार
२४ - ०१ - २०१५

शुक्रवार, २ जानेवारी, २०१५

तो पाऊस खिशात घेऊन उंडारायचा



 जयंत (विद्वांस) राव
शप्पत सांगतो
तो पाऊस खिशात घेऊन उंडारायचा,
वाऱ्यावर स्वार होऊन फिरायचा,
डोंगर माथ्याला गुदगुली करायचा
कधी खोल दरीत सूर मारायचा..

उंच झाडांची शेंडी ओढताना
पाहिलंय मी त्याला,
विमानांची बोट करताना
साहिलंय त्याला,

सूर्याला झाकताना
स्वत:च काजळायचा,
लपंडावात चांदणी समोर
चंद्राला उघडा पाडायचा...

कसले कसले आकार धारायचा,
ओळखू बघू जाता खुशाल फिरायचा !
सख्खा मित्र याचा वारा
अभिमान त्याला "मै आवारा"...

अखेर तेच झाल, हरवून बसला
कुठेतरी पाऊस खिशातला !!
शोधतोय आता
भर पावसाळ्यात त्याला..

कालच पाहिले त्याने खिडकीतून,
तुमच्या घरात दिसला पाऊस,
मुसमुसताना तुमच्यासमोर ...दिलात आसरा,
हळवेपण जपण्याची
कवी मनाला भलतीच हौस!!

आता रित्या खिशाने कसे जावे याने
रानात, वनात, कवीच्या मनात,
शेतात, मळ्यात, गायकाच्या गळ्यात?

झोपलाय म्हणता तर झोपू दे जरा
पण उठण्या आधीच अलगद त्याला
ठेवा परत याच्या खिशात...

पावसाविना ढग राहील कसा,
चमकत्या विजेला भिडेल कसा?

- श्रीधर जहागिरदार

रसप (मला हात धरून पुन: लिहीत करणारा मित्र )



१, (उधारीच हसू - रणजीत पराडकर )
रेशीम लडीगत उलगडलेली
एक संवेदनशील यात्रा....
मनात रुजलेल्या हुरहुरीची
उधारीच हसू आणून भरवलेली जत्रा....

सारेच सामील, कधी हिंदोळ्यावर,
कधी पोटात गोळा आणणाऱ्या मेरी गो राउंडवर,
मिटलेल्या डोळ्यांनी,हळुवार,
फिरून आलेले त्या थबकलेल्या क्षणांपर्यंत...
प्रत्येकाच आपल अस एक मोरपीस असतच,
मनाच्या गाभाऱ्यात दडवून ठेवलेलं...
असतच एक नांव, परतणाऱ्या लाटेबरोबर
अथांगतेत वाहून गेलेलं...

असेलही तुझ हसू उधारीच,
पण आमच्या ओठांचे कोपरे दुडपले होते,
आमच्याच आतल्या ओलाव्यान ...

२.
सालाबादाप्रमाणे येणारच पाऊस,
कधी धुमसत,
कधी भिरभिरत,
कधी कोसळत...

त्याला आता माझ्या कौतुक शब्दांनी
बांधत नाही मी.
तू असा, तू तसा, हे सांगायला
मनात एक ढग उमलावा लागतो,
मी तर सारे सूर्यच  नाकारून बसलोय
आणि साऱ्या बाष्पाचे झालेत कधीच हिमकण!

मात्र  तू बरसलास की चिंब भिजायला
अजून आवडत मला, स्पष्टच सांगतो
'लाईक' च  करतो मी, तुझी एकच  सर आली तरी,
माझ्या कौतुक शब्दांना तुझ्या सरीची सर नाही रे..
तेव्हा रसप तू बरसत रहा , पसरत  रहा
थेंब न थेंब असाच ह्या हिमनगावर!!!

- श्रीधर  जहागिरदार

काही कविता (दिपा मित्तिमणी यांच्या )


काही कविता अशा भेटतात
वाचून झाल्या कि खिडकीपाशी
घेऊन जातात,

कवितेचे पुस्तक हातात,
वाचलेल्या कवितेच्या पानावर रुतलेले बोट,
कविता ते सोडायला तयारच नसते...

आत .. खोल .. कांही तरी घडत असते,
नजर दूर ते काही शोधत असते...

अचानक गवसतो दूर-जवळ सांधणारा पूल,
मनावर पांघरलेली जाड झूल
दूर होते; कवितेत रुतलेले बोट सैलावते,

खिडकीत कुठूनशी येऊन बसलेली
चिमणी कौतुकाने माझ्याच कडे पाहत चिवचिवते,
उडून जाते,
माझा नवा ताजा चेहरा पहायला
मी आरशासमोर, तर आरसाच हरवलेला
मला गरज नसल्यासारखा...

 - श्रीधर जहागिरदार
3-2-2013

निरांजन

 


निरांजन
**
कधी अचानक उतरते एक तिरीप
अस्वस्थ अंधार चिरत
सरळ खोल आत,
आणि मग घेता येतो मोकळा श्वास मला …
मुक्तपणे तपासून बघतांना
प्रतिबिंब माझ्याच जाणीवा नेणीवांच !

कुठल्याही स्थापित संकेतांना
बांधील नसलेला मनाचा  धूसर आरसा
दाखवून देतो स्वतंत्र, स्वायत्त
अस्तित्व भान माझं,
माझ्याच विचारानुभावातून प्रगटलेल …

ज्या गहन तिमिरातून
स्वत:लाच ओरबाडत,
झिडकारत, लाथाडत
शोध घेतलाय स्वत:चा ,
तो तिमिर जसा माझा
तसाच माझ्या जखमातूनच
वितळलेला, उधळलेला, उजळलेला
हा लख्ख प्रकाश देखील माझाच,
दाखवू नका त्यावर कुणी आपला
पिढीजात हक्क,
असू द्याना माझाच ताबा त्यावर !

कुठल्याही देवळातल्या सत्याला
आव्हान द्यायचं मी कधी
आणल नाही मनात,
माझ्या देव्हाऱ्यात पेटलेल्या
ह्या निरांजनाचा प्रकाश एव्हढा
कां छळतोय कुणाला ?

- श्रीधर जहागिरदार
७/७/१३ 

नदी : (अमेय पंडित यांच्या काव्य प्रतिभेस )






नदी 
कशीही वळते
झाडातून, माडातून ,
वनातून, रानातून….
निर्वेध वहाते
दरयातून, खोऱ्यातून
माजलेल्या तोरयातून …

सहज सळसळते
बेधडक खडकातून
नागमोडी वळणातून …
अकस्मात कोसळते
उत्तुंग प्रपातातून…
संथ वहाते
गहन खोल पात्रातून …
नदी
भेटली होती का कधी
अमेय, तुमच्या प्रतिभेला ?

- श्रीधर जहागिरदार
१ जून २०१३   

सहज

सहज
कोण कुणावर ठेऊन असतो डोळा
हे कळत नाही, मात्र प्रत्येक जण
नकळत शोधत असतोच काही न काही,
सहजच!

सवड मिळाली की मी देखील,
सहज  भिरभिरतो फेसबुकवर
शोधत जुन्या मित्रांना,
असलेल्या मित्रांच्या माध्यमातून,
 ह्या भिंतीवरून त्या भिंतीवर ….
जगाव म्हणतो पुन: मागे पडलेलं आयुष्य ….

पहाव कुणाला काय काय आठवत
सायकल वरून मारलेल्या  चकरा
भिरभिरत्या नजरेन शोधत गंधवारा;
सुटलेल्या पोर्शनच्या व्यथा,
फुटलेल्या पेपरच्या अगम्य कथा,
नाटकात चुकलेले संवाद,
घडलेल्या नाटकावरून उडलेले वाद,
निकालाला लागलेले एटीकेटीचे अस्तर
आणि जाणून घ्यावं कसे कापले त्या नंतरचे अंतर
.
.
.
.
.
असाच भिरभिरत पोहोचलो
आज तुझ्या भिंतीवर केशवा,
तर कळल
त्यानं आधीच गाठलं होत तुला
सहज !

तो कुणावर ठेऊन असतो डोळा
हे कळत नाही
आणि कळणारही नाही, तोवर …


जोवर ……………



- श्रीधर जहागिरदार 
२४ आगस्ट २०१४