शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

त्या दिवशी होळी होती....

त्या दिवशी होळी होती....

घरात अस्त्याव्यस्त पसारा....
जुनी, धूळमाखली टेबल खुर्च्या ,
पत्र्याच्या पेट्या, जुन्या कापडी पिशव्या,
रोजच्या लागणाऱ्या सर्व वस्तू भरलेल्या त्यांतून,
पलंगा शेजारीच सार काही, हातासरशी म्हणून ... 

एका वहींत  
बरंच काही चौफेर खरडलेलं..
कविता, हिशेब सारवासारवीचे, 
मनातलं, साचलेल,
एकटेपणात लिहून मोकळ केलेलं....  

त्या दिवशी होळी होती....

आठवलं मला...
लहानपणी सांगायचीस होळीचा अर्थ,
पुराणातल्या प्रह्लाद-हुताशनी च्या गोष्टी आणि
तुझा आपला स्वत:चा : ' होळी असते एक संधी,
नको असलेले जुने पुराणे, 
जाळता येणारे सामान स्वाहा करण्याची...
मग सजवता येते घर नव्या वस्तूंनी", 
आणि हसायचीस...

त्या दिवशी होळी होती...
तिन्ही सांज झालेली,



त्या एका खोलीत,
चौकशीला आलेले दोन चार,
ते आलेले कारण आम्ही आलेलो, भावंड, 
पलंगाच्या आसपास  जमलेली..

"ऐक, जुने विचारही स्वाहा करता 
येतात  होळीत, जखडून जुन्याला 
जाता येत नाही पुढे.." ; 
समजावून सांगायचीस, आठवल मला,
"होणारा त्रास पचवायला शिक,
काळाबरोबर रहा..."

त्या दिवशी होळी होती...
तिन्ही सांज झालेली,
होळीच्या तयारीत सारे...

तुझा हात थंड... हळू.. हळू ..
गळून पडला माझ्या हातून,
संथ ......सावकाश.....

बाहेर बोंब...
मनात  कल्लोळ ....
त्या दिवशी होळी होती,
खोल मनात पेटलेली, 
उरलेल्या आयुष्यासाठी 
धुळवड उडवून गेलेली.....



- श्रीधर जहागिरदार 



२१-०४-२०१२ 

तुझी आठवण ...

तुझी आठवण येते!
हे हळवेपण;
कळते, सलते, तरी ओघळते,
पानावरुनी अलगद दंव कण!

तुझी आठवण येते!
ही हतबलता;
छळते, गिळते, उरी गलबलते,
कातर वेळा मनात भरता!

तुझी आठवण येते!
हे आधारित जगणे;
रुतते, खुपते, मनात सलते, 
नजरेत आपुल्या मरणे!

तुझी आठवण येते!
ऋण जन्माचे;
जपते, फिटते, तरीही उरते
बंधन, भाव मनाचे!

तुझी आठवण येते!
स्निग्ध दिलासा
देते, भरते, रीत्या मनाते
विश्वास हवा हवासा!


 - श्रीधर जहागिरदार
१९ - ०४ - २०१२ 

   

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१२

गाणे गावे कोणा साठी?


गाणे गावे  कोणा साठी?    
जो तो धावे मोहा पाठी ...

ज्याच्या पाया स्पर्शू जावे,   
तोची माथी घाली लाठी...

कोडी माझी घालू कोणा,
ज्याची त्याची बुद्धी नाठी...

खांदा देता उडती पिल्ले,   
म्हाताऱ्याला नाही काठी...

ओठांचे ओठांशी नाते
जिव्हारी त्या पक्क्या गाठी ...

कैसी भागे  तृष्णा माझी      
पाण्या माजी उष्मा माठी....

- श्रीधर जहागिरदार 
१३.०२.२०१२ 




सोमवार, ९ एप्रिल, २०१२

"नीरवता"


हरिवंशराय बच्चन यांच्या रचनेचा भावानुवाद:


नीरवता पसरे अवनीवर,
कान नभाला, उत्सुक, आतुर,
अगणित कंठामधील सुस्वर, परी कसे ना ऐकू येती
जन हे म्हणती, तारे गाती...

सुरेल गायन स्वर्गच ऐके,
धरा जाणते निव्वळ इतके
अगणित दंहिवरबिंदु मुक्याने ताऱ्यांचे त्या अश्रू गळती
जन हे म्हणती, तारे गाती...

देव अंबरी, मानव खाली,
नभात गायन- क्रंदन वसली,
पंचम स्वर तो चढतो वर वर, आसू खाली खाली झरती,
जन हे म्हणती, तारे गाती...


मूळ रचनाकार : हरिवंशराय बच्चन
स्वैर भावानुवाद :श्रीधर जहागिरदार

मूळ कविता :
सन्नाटा वसुधा पर छाया,
नभ में हमनें कान लगाया,
फ़िर भी अगणित कंठो का यह राग नहीं हम सुन पाते हैं
कहते हैं तारे गाते हैं

स्वर्ग सुना करता यह गाना,
पृथ्वी ने तो बस यह जाना,
अगणित ओस-कणों में तारों के नीरव आंसू आते हैं
कहते हैं तारे गाते हैं

उपर देव तले मानवगण,
नभ में दोनों गायन-रोदन,
राग सदा उपर को उठता, आंसू नीचे झर जाते हैं
कहते हैं तारे गाते हैं....

- हरिवंशराय बच्चन


रविवार, ८ एप्रिल, २०१२

प्रश्न पडायलाच हवेत...


प्रश्न  पडायलाच हवेत...
कोण? कां? कुठे? कसे?

अरे उद्गारून तर बघ 
ते प्रश्न ..
जे कुरतडून काढतात,
तुझे पाय,
अन खिळून राहतोस तू,
आंत घोंघावणाऱ्या 
वादळांचे भोवरे सोसत,
उसासत....

हे असे असतेच  कुणी 
तुझ्या प्रश्नांसाठी उत्तरे
उरात घेऊन  जन्मलेले...

तो बघ कुणी ,
अविरत प्रेम वर्षाव करतोय...
खिळ्यांचे प्राक्तन सोसून
आपणच वाहून आणलेल्या 
क्रुसावर लटकावला गेला तरी.... 

शोध आपली उत्तरे त्याच्या 
ठिबकत्या रक्तातून....

आणि तो तथागत,
तथाकथित ऐश्वर्याचे 
माजोरी मोह भिरकावून 
शोधीत फिरला
अटळनिय दु:खाचे मूळ,
अन निवारण...
मग वाटत राहिला 
ज्ञान बोध, हर एक
शरणागताला...

शोध आपली उत्तरे 
एकदा तरी
चाकोरीतून निघून,
नव्या वाटेवर...

प्रश्न पडायला हवे...
प्रश्न पडायलाच हवेत..
सुरुवात तरी कशी होणार अन्यथा 
तुझ्या प्रवासाला? 


- श्रीधर जहागिरदार
८.०४.२०१२ 


मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

उत्सव ... .


१.                                                                                                      
नुकतीच फुटली पालवी!     

                                                                

फांदी फांदी वृक्षाची,
शहारली......
हिरवाकंच नेसून शालू, 
आकाशमिठीत
सुखावली !!

२.
बेभान झालाय वारा! 


थरथरले, नितळ निळे
जलाशयाचे अंग....
आवेग अनावर,
उठती, एकामागे
एक तरंग !! 

३.

कोसळताहेत धारा!   


युगायुगाची तृषार्त  
ही माती सावळी, 
मृदगंधाचे रांजण 
उलथून, निपचित
सचैल पडली!!

४.
पसरले ऊन  निवांत!


 फुलें रेशमीं बटात
हिरव्या, पडली गुंतून,
तृप्त पहाटे,वृक्ष उभा , 
काठावर ...
ओथंबून!!



- श्रीधर जहागिरदार 
९.०३.२०१२