बुधवार, १७ जुलै, २०१३

आरसा



मी म्हणालो आरशाला :
"कां कळेना, माझे तुझे न पटले कधी …. "
तो म्हणाला :
"जीवनाचे संपलेत का खटले कधी? "


"बघ जरा, मी वाटतो आनंद आहे … "
मी म्हणालो,
तर म्हणाला :
"जे नसे पात्रात ते वाटण्याचा छंद आहे !!"

३.
"आरशा  रे, आज मन मलूल आहे !"
"वळ जरा, बघ तिथे, उमलते एक फूल आहे "


मी म्हणालो :
"केव्हढी रे धूळ ही …! हातास बघना लागली "
तो म्हणे :
"जळमटे आतील वाटे डोकवांया लागली !"

५.
विचारतो आरसा मला :
"कां बुवा हैराण तू?"
"रोज होतो स्वच्छ तरी
राहतो रे एक किन्तू…. "


उदास मी :
" सूर विरले आहे जगातील,
कानी पडेना …"
तो म्हणाला :
"आंत तुझ्या गोंगाट वेड्या…
वाढलाना ! "


मी म्हणालो आरशाला :
" वासना छळतात, अंत नाही "
आरसा हसला, म्हणाला :
"गाढवा, माणूस तू, कुणी संत नाही !"

८.
रे आरश्या मला कळेना :
"कां भेदरते सुख? माझे दार कां त्या पारखे?"
म्हणे आरसा :
"दु:ख मनात बांधलेले भुंकत असते सारखे … "


"डोकावता तुझ्यात मी
दिसतात मला शत मुखे !
आरश्या कां हे असे?"

"जगणे तुझे भंगलेले
विखुरलेले… इथे तिथे …
सत्य तुजला ते दिसे ! "

१०
ऐक आरशा  :
"शोधलेली सुरांनी आज माझी वाट आहे "
तो वदे :
"विझलेला दिसतो आतला गोंगाट आहे ! "

११
आरशा ला पुसताच मी
आरशाने पुसले मला

स्वच्छ वाटे दोघास आता
श्वास झाला मोकळा ….

- श्रीधर जहागिरदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा