गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१२

जरा वेगळे वाटते...

खोल आत दाटलेले, पण कधी न आटलेले,
क्षणांत ये उफाळूनी, घे मना कवटाळूनी, 
जगताना त्या क्षणास, जरा वेगळे वाटते... 

पुस्तकांत मिटलेले, होते जरी तुटलेले,
मोरपीस आठवतो, गीत खुळे आळवतो,
जगताना त्या क्षणास, जरा वेगळे वाटते...  

रोज रोज जी हुजुरी, खळगीसाठी ही मजुरी,
परिवारात करतो मजा, सहज टाकुन मी रजा,
जगताना त्या क्षणास, जरा वेगळे वाटते...

निमुटपणे हर वारी, भ्रष्ट बघतो कारभारी,
दिली घोषणा 
दणक्यात,उभा राहून घोळक्यात 
जगताना त्या क्षणास, जरा वेगळे वाटते... 

तू असता माहेरास, विसरतो हमखास, 
त्या सुचना साठवून,पाळतो मी आठवून
जगताना त्या क्षणास,जरा वेगळे वाटते... 
जुनी भेट स्मरताना, हात तुझा धरताना, 
सहज घातला डोळा, CCD तील ललनेला, 
जगताना त्या क्षणास, जरा वेगळे वाटते... 

- श्रीधर जहागिरदार 
   १५.०२.२०१२ 


शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१२

जाता जाता...


ठरवून केले वार  मागुनी  दिले  खुलासे जाता जाता,
लढण्याला मी  समर्थ आहे, नको दिलासे जाता जाता...

रमलो येथे रसिकागत मी, खुल्या दिलाने दाद दिली,
गळ्यातुनी निघतील अचानक सूर जरासे  जाता जाता...

अपराधाचे ओझे ओढत उभा जन्म मी जळलो आहे,
दिलीस माफी जरी कधी ना,  ऐक खुलासे  जाता जाता...  

किती बुडबुडे शब्दांचे मी  उडवत फिरलो ठायी ठायी,   
निरर्थकाचा अर्थ गवसला, उगाच भासे जाता जाता... 

गृहीत धरुनी तुला वागलो तरी न मजला  बोल दिला,
सहवासाचा गंध तुझ्या मज मनी विलासे जाता जाता...

अज्ञाताचे भय कातरसे, "श्री" अंधाराच्या कुशीत शिरला,
मिटले डोळे उघड जरा बघ  प्रकाश हासे  जाता जाता...  

- श्रीधर जहागिरदार