बुधवार, १५ डिसेंबर, २०१०

उपरती



डोळा स्वप्न पाहु नये
पहाटेचा शाप साहू नये...
वळणावरती थांबू नये
चुकामुक मग सांगू नये...
स्मितात कुठल्या फसू नये,
होउन दिवाणे बसू नये...
वचनात फसव्या गुंतू नये,
आंसुत हळव्या खंतु नये...
मिठी कुणाशी जुळवु नये,
दिठी मोकळी हरवू नये ...

सोमवार, १३ डिसेंबर, २०१०

गीत



विरल्या कुठे माझ्या फुला त्या गंध चमेली शपथा
त्या चन्द्र-खुणा, त्या भाव-खुणा, त्या दंवात भिजल्या कथा।


फुलपांखरी गीत प्रीतीचे अधरावर फुलले,
उडून अचानक तव ओठांवर अलगद जाउन झुलले,
त्या गीताचे सूर विसरली बहर वनातुन जाता ....
विरल्या कुठे माझ्या फुला त्या गंध चमेली शपथा।


चन्द्र मोकळा दिठीत आला, मिठीत कुंतल रात,
स्पर्शामधुनी वीज थरकता, झाली गंध-गहन बरसात,
त्या गंधाचे दंश अनोखे आठवतो मी आता ...
विरल्या कुठे माझ्या फुला त्या गंध चमेली शपथा।

बुधवार, ३ नोव्हेंबर, २०१०

दिपावलीकी शुभकामनाये



दीये दीये में रखी जो बाती,
सारी रात ज्योत जगाती ,
स्नेह की धारा रिश्तोंकी
जीवनभर का साथ निभाती।
**************************
एक अदनासा सुर्ख पटाखा,
जलता, उड़ता, आकाश है छूता,
मनके अन्दर ऐसी प्रतिभा,
खिले, निखरे, तो जग है जीता।
***********************

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०१०

गुंता


इथून ना वळणार, आता कधीच वाट,
ही रात्र लांबलेली, होणार ना पहाट।

दिगंतात पसरले, अथांग वाळवंट,
कसे पार व्हावे, हा हताशला ऊंट

या हताशतेला, आसवाचा निवारा,
दिनरात ठेवलेला डोळ्यांवरी पहारा।

आता कसे जगावे होउन मश्गुल
श्वास मोकळा देतो सदाच हूल।

मी न तोडलेली माझी जन्मनाळ
गुंतलो तयात हा एकमेव आळ।

नात्याविना जगण्यास काय अर्थ,
ना हे ना ते, साराच रे अनर्थ॥










बुधवार, ७ जुलै, २०१०

मोकळा


उघड्या माळावर जन्म झाला तेव्हां
निळ्या स्वप्नांची छत्री धरली, ह्याच आकाशानं,
आगपेटीच्या जगाबहेर पडून,
मुक्त संचारलो ह्या नील छताच्या आधारान।
रांगत पाऊल धरु लागताच
इवल्या सशाला भेदरवल ह्याच्याच गडगडाटान,
रखरखीत निवडुंगावर
शिंपण केलं तेही  ह्याच्याच थयथयाटान।

मिट्ट काळोख्या रात्री
आशेच्या विजेऱ्या  पेटवल्या ह्या अंबराने   ,
आभाळा एवढ्या चुका देखील 
खाली घातल्या ह्या चांदणाच्या पदराने  ...

असीमित क्षितिजापर्यंत पसरलेल आकाश,
आकाश नव्हतं, विश्वास होता मनाचा,
कोसळेल कोसळेल म्हणुनही न कोसळेल अंबर
आधार होता पांगळ्याचा

उघड्या माळावार जन्मणाऱ्यांची 
ही होती नियती, 
आगपेटीबाहेर पडून जगणाऱ्यांना
ह्याचीच तेवढी शाश्वती।
पण.... पण ...
ज्ञानाची दिवटी कुणीतरी पाजळली,
सोनेरी कड विश्वासाची मग काजळली,
'हे आकाश, आकाश नाही आभास आहे'
नसलेल्या अस्तित्वाचा हा भास आहे ...
माझ्या आधाराचा, भरवशाचा हा ऱ्हास आहे।


येवढी फसवणूक ? एवढा धोका?
आता ....


आता आकाश फाटल तर मी
एक ठिगळही लावणार नाही !
(कारण नसलेल आकाश
कधी फाटणारही नाही!!)




रविवार, २५ एप्रिल, २०१०

खड़क

बेवारशी लाटांचा उनाड खेळ,
आणि ही अतृप्त संध्याकाळ ...

तुही असायला हवी होतीस खरंतर, 
पण सापडल्या नसतील तुला
पुसल्या गेल्या कालच्या पाउल खुणा..

दोष तुझा नाही ह्या सळसळत्या लाटांचा
सारे काही पुसुनसुध्दा, आयुष्य तर
सुरु आहे म्हणत, मिरवणार् या.....  

मी मात्र खड़क झालोय,

कणाकणान तुटणारा.
पायथ्याशी
त्या संध्याकाळचे सारे रंग एकवटून
काही शिंपले आणि  एक गजरा
कुणा मानिनीच्या केसातून गळलेला......
कधीतरी तर येशीलच तू
पुसल्या गेल्या पाउलखुणांचे भान विसरून
नव्या पाउलखुणा उमटवत,
 तेंव्हा
एक नवाच खड़क आढलेल तुला
लाटांच्या आवेगाने क्लांत झालेल्या तुझ्या
देहाला आसरा देण्यासाठी, तेवढाच
आतुर अन तसाच समंजस!

रविवार, १४ मार्च, २०१०

कैफियत

मान्य, हैराण आहात पाहून
माझ्या डोळ्यातले अथांग शुन्य।
मात्र नाही हे, माझ्या निर्लज्ज
बेछूट, गांजेकसपणाचे पाप
हा तर तुमच्याच दांभिक पाखंण्डाचा शाप!
ज्याची वेळोवेळी दिलीत ग्वाही
ते निलघन आकाश,
खुद्द आहे निरस्तितवान निराश...
पायाखालिल काळी टणक
धरतीच दुभंगलेली,
समाधी कळसांच्या
केशरध्वजांची भंगलेली।
पडसादात उमटती, वारयाचे  निश्वास
इथे तिथे भरलेले शुन्याचे आभास ..





भंग अभंग



मना लागले अंधाराचे खूळ,
व्यथेची चूळ, मुखी असे।

अस्तित्व स्वत:चे दावी वाकुली,
जीर्ण सावली, फक्त हसे।

गळून पड़ती पिकल्या आशा,
पालवे निराशा, निष्पर्णातुन।

सबल तनी वसे खुजावले मन,
जगतो जीवन, मी मरणातुन।

गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

भान




मुखी राम नाम, तरी झाला धोका,
आता माझा सखा, सखाराम*।

आजवरी बोल, बोललो सरळ,
ओकीन गरळ, आता सारे।

तत्त्व, मूल्य, निति, सत्यावरी  निष्ठां।
आता तिथे विष्ठा टाकीन मी।

साध्या या जिण्याचे, मोजले मी मोल,
आता कां मी तोल, सावरावा।

आता मी जाणोनी, बांधलासे चंग,
असंगाशी संग, ठेवणार।

सखाराम बाईंडर