सोमवार, २२ जून, २०१५

गालगुच्चा


"तुझ्या कविता ऐकायला येतेय", असा 
तुझा निरोप आला कि मला हसूच यायचं
कारण तुझा आणि कवितेचा बादरायण संबंध नाही
हे मला ठाऊक होत
यायचीस आणि म्हणायचीस,
"चल  वही वगैरे काढून ठेव, तोवर मी भजी करायला घेते"
सारी तयारी बरोबर घेऊन आलेली असायचीस तू.
मी मनापासून वाचायचो कविता तुझ्यासाठी
एका पाठोपाठ एक …
मधून मधून भजी आणि वाफाळलेली कॉफी
तू मधून मधून दाद द्यायचीस
"वा ", " काय कल्पना आहे, पुन्हा वाच" …
"काय समजल ग तुला ह्या कवितेतल ?"
मी विचारल होत एकदा
तर म्हणालीस, "तू समजलास, तेव्हढी समज खूप झाली"
.
.
निरोपाच्या वेळी कवितांची वही तुला देऊ केली
तर म्हणालीस, "नको, कवितांचा गालगुच्चा नाही घेता येत !"
त्या नंतर त्या वहीतल्या कविता वाचल्या नाहीत,
 कधीच, कुठेही
कांद्याच्या भज्यांनाही कवितेची चव आली नाही कधी !!
- श्रीधर जहागिरदार

रविवार, १७ मे, २०१५

जिद्द

जिद्द

जंगल कापली जाताहेत
त्याच्या दशपटींनी
त्याच वेळी उगवताहेत
आपल्या आतील श्वापदांसह
माणसांच्या मनात ….
शीळ हरवलेली पांखरे
कावरी बावरी फडफडताहेत
निलाजऱ्या गिधाडांच्या छायेत
सूर्याचा शोध त्यांचा
वाटतोय संपुष्टात आलेला….

अवखळपणा विसरून
वाहते झरे स्तब्ध झालेत,
कोरड्या पडलेल्या तळाशी
साचू लागलाय फक्त गाळ,
वातावरणातला ….

तरी लक्ष वेधून घेतो
कातळातून  डोकावणारा
एक तृणांकुर,
जिद्दीने श्वास घेऊ पाहणारा ….  

- श्रीधर जहागिरदार
१७ मे २०१५

रविवार, १२ एप्रिल, २०१५

मी खरा …



वाटलो जोषात होतो
पण खरा कोषात होतो

साधले काहीच नाही
फक्त मी घोषात होतो

जोडली माया किती मी  
पण कधी तोषात होतो?

प्रेम भक्ती वाटताना
अंतरी रोषात होतो

आरशाचा दोष नाही
मी खरा गोषात होतो

- श्रीधर जहागिरदार
१२-०४-२०१५

शुक्रवार, १३ मार्च, २०१५

प्रवास



अनेक प्रवास केलेत
एकमेकाच्या संगतीने

भर दुपारी
तुडवत उष्ण वाळवंटे भारलेली मृगजळाने
अन्यमनस्क मनाने, चिर-तृषिता सारखे ...

कधी संध्याकाळी
हातात हात वगैरे गुंफून ओल्या वाळूवर
पाठ्य पुस्तकातले धडे गिरवल्या सारखे …

रात्री बेरात्री
वासनांच्या लाटेवर विरघळत, निथळत
सत्कृतदर्शनी मिठीत हरवल्या सारखे ...

उद्या पहाटे
निघुयात का नदी काठी, देवळाच्या दिशेने
असंग विरक्त धवल वगैरे मनाने, नव्या प्रवासाला?

- श्रीधर जहागिरदार
१३ मार्च २०१५

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०१५

वागणे

तुझे वागणे हे कुणा सारखे ?
तगे वादळी त्या तृणा सारखे ...

तिने सोडली ना कधी पायरी
तुम्ही वागला ते हुणा सारखे …

गुन्हेगार येथे मिळावे कसे
शहाजोग पुसती खुणा सारखे  …

जिण्याचे न सौदे जमावे मला
अखेरास लेणे गुणा सारखे ….

जपावे खयालास मतल्यातल्या
नव्यानेच रुजल्या भ्रुणा सारखे

- श्रीधर जहागिरदार
०५-०२-२०१५

रविवार, १ फेब्रुवारी, २०१५

रस्ता भिकार आहे


गाणे टुकार आहे
श्रोता शिकार आहे

चालीत रेकण्याचा
भलता प्रकार आहे

सुरताल सोडण्याचा
ह्याला विकार आहे

आलाप पेलण्याला
ह्याचा नकार आहे

ज्ञानात शून्य, ह्याला
गुर्मी चिकार आहे

पडतो पिऊन, म्हणतो
रस्ता भिकार आहे

कोणी म्हणोत काही
'श्री' निर्विकार आहे

- श्रीधर जहागिरदार
०१-०२-२०१५

तेच तेच


रोज रोज तेच तेच
जीवनाची रश्शी खेच …

उठा उठा गिळा गिळा
इथे तिथे पळा पळा...

रहा उभे, तिथे बसा
दाखव कुठे तुझा ठसा....

सवयीची मुका मुकी
नसते झेंगट फुका फुकी....

हेच हेच रोज रोज
किती उरे मोज मोज....

जीव तगे कसा बसा
तरी म्हणे हसा हसा...

श्रीधर जहागिरदार
३१-०१-२०१५