बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

खिशात समुद्र भरता येत असेल तरच


खिशात समुद्र भरता येत असेल
तरच ती काडी काडेपेटीवर घासा रे …
उगाच आपले आग लावत फिरायचे उद्योग करू नका
बागेत पाखरेहि असतात, होरपळतात ती
आणि कोमेजतात फुले पहाटेच फुलण्याच्या वेळी !
पाखरे होरपळली कि पडतात भक्ष्य
व्यवस्थेच्या खातीरदारीत, तर
निसटलेल्या काहींची, होतात गिधाडे,
कोमेजलेल्या फुलांना पारजणारी   ….
येउन बसतात ती, बागेतल्या अतिप्राचीन
विस्तीर्ण, महाकाय वृक्षाच्या गार ढोलीत
छातीतला विखार जपत ….
बघतात,
भिडताना माळ्यांच्या टोळ्या
निसर्गदत्त इंद्रधनुष्याच्या रंगातला
फक्त एकेक रंग ओरबाडून,
बागेतील समस्त वृक्षवल्ली, फुले कळ्या
आपल्याच एका रंगात पेटवून काढण्याच्या मिषाने… 

चढवतात हल्ला मग, ढोलीतली गिधाडे टोळ्यांवर,
फुला - पाखरांना वाचवायला
उसळलेल्या आग डोंबात गिधाडे होतात धाराशायी,
होरपळतात पाखरे, कोमेजतात फुले,
होरपळलेली पाखरे, पाहिली आहेत मी
गिधाडे होताना, कोमेजलेल्या फुलांना पारजताना ….
म्हणून
खिशात समुद्र भरता येत असेल
तरच ती काडी काडेपेटीवर घासा रे …
- श्रीधर जहागिरदार

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

पुरावा


दरवेळी असेच होत आले  !

त्याने तिला। एकदाच । एका कोपऱ्यात । तिच्या मनाविरुद्ध । कुठलाही कायदेशीर अधिकार नसताना । वासनेच्या अंधार क्षणी वगैरे … मारून टाकले मनानिशी  !

पुरवता आले नाहीत तिला समाधानी पुरावे,
न्याय मिळवण्यासाठी  ह्या हत्येचे, त्यांना हवे तसे ... 
त्या पुराव्यांचा पाठपुरावा करताना
सारे संभावित तिच्या अंगांगावर
प्रश्नांची नखे रुतवत, मनातल्या मनात
उपभोगत राहिले तिला
आणि  
जगावी लागली तिला ओंगळ सात मिनिटे
मनाविरुद्ध । पुन्हा पुन्हा …। कायदेशीर ठिकाणी . …. । कायदेतज्ञांच्या अखात्यारात। न्याय मिळेल ह्या आशेच्या अंधुक क्षणी ….
तिची बातमी करताना
ते ही  तेच घडवत राहिले, अहोरात्र
घराघरातल्या दिवाणखान्यातून
प्रकाश करून टीवीच्या पडद्यावर
कायद्याचे राज्य पुनर्स्थापित व्हावे ह्यासाठी …

पेटत्या मेणबत्त्या सांगू लागल्या तिला
सोड बाहूलीपण, हो ज्वाला
सबल हो सबल हो स्वबलाने लढ लढा


अखेर
पुढच्या वेळी ते घडताना
तिने एकवटले धाडस
ओरबाडून छाटले त्याचे ताठर शस्त्र
पुन्हा पुन्हा अस्तित्वावरच आघात  करणारे
आणि सरळ ठेवले नेऊन हातात
पुरावे मागणाऱ्यांच्या…

कायद्याच्या हतप्रभ सेवकांनी
तडकाफडकी केला गुन्हा दाखल
हत्येच्या प्रयत्नाचा 
आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा
तिच्या धाडसाविरोधात !!
*
(नर मादी संघर्षात
पौरुष गमावलेल्या नराने
हिरव्याकंच झाडाला लटकून
आत्महत्या केल्याची बातमी
जाहिरातींच्या चार पानानंतर
तिसऱ्या पानावरच्या तिसऱ्या रकान्यातली
वाचलीत का तुम्ही?)

- श्रीधर जहागिरदार