गुरुवार, ३१ जानेवारी, २०१३

चाहूल

(दोन वर्षापूर्वी लिहिलेली एक कविता, गझल स्वरुपात पुनर्लेखीत केली आहे)



गेलास टाळुनी ते , माझेच दार होते,
दोस्तीत वागणे हे, नक्कीच फार होते!

चाहूल लागली अन मैफल जमून आली
ती रात्र पेलण्याला, पेले तयार होते!

जो तो उतावळासा "फोडेन मीच वार्ता"
मोजून आणलेले खांदेहि चार होते!

आधीच फोडलेले टाहो अधीर त्यांनी,
ज्यांच्या कडून माझे येणे उधार होते!

पश्चात 'ऊब' ज्यांना, त्यांना उगाच वाटे
हातात हात याचे कधिचेच गार होते !

गेलास तू वळूनी, मारून फक्त टिचकी 
झाले निराश
ज्यांचे सुकण्यात हार होते!

भेटीस आपल्या ह्या अटकाव खूप झाला 
"श्री" हे  तुझ्या मनाचे भलते प्रचार होते !

- श्रीधर जहागिरदार
३१-०१-२०१३

गुरुवार, २४ जानेवारी, २०१३

चालतो...

अनेक शूल काळजात सोसतो नि चालतो
सुरेख फूल रोज एक शोधतो नि चालतो...

उठेलही तुफान, ही मनात खूणगाठ पण
तुझेच नांव आळवीत डोलतो नि चालतो ..

कधी तिमीर दाटतो खुशाल वेळ मोडुनी
प्रकाश अंतरातलाच लाभतो नि चालतो...

अनेकवार प्रश्न खोल भोवऱ्यात खेचती
असे प्रवाह मी जळात टाळतो नि चालतो...

कधी, कुठे, कशास, कोण, चौकशा मला नको
मुळात धर्म चालणेच, पाळतो नि चालतो...
  

- श्रीधर  जहागिरदार
२५-०१-२०१३





शनिवार, १२ जानेवारी, २०१३

रंगमंच




माझा मुखवटा लढतोय
एका स्वतंत्र अस्तित्वासाठी ...


थकलाय तो,
चेहऱ्याचा पाखंडीपणा लपवून लपवून ..
जाणतो तो,
प्रकाश-वंचित चेहरा होतोय
हळूहळू विदीर्ण, विरूप....
बघतोय तो वाट चेहऱ्याच्या
संपूर्ण विरून जाण्याची;
आपल्या जिवंत होण्याच्या क्षणाची....


पण असणार असेल तो क्षणही
एका कोवळ्या मुखवट्याच्या जन्माचा,
कारण प्रत्येक विरत जाणारा चेहरा
पेरत असतो एक बीज नव्याच मुखवट्याचे !!
*

मुखवट्या विना शिरू शकत नाही
कधीच भूमिकेत चेहरा कुठलाही !


हाच आहे ह्या रंगमंचाचा नियम !!



- श्रीधरजहागिरदार
१३-०१-२०१२




गुरुवार, १० जानेवारी, २०१३

एक साल गुजर गया ...


एक साल गुजर गया, क्या कर गुजर गया?
क्या बना ? क्या मिटा? सवाल कर गुजर गया  ...
..
यह रचा, वह रचा, मात्र था हल्ला मचा,
ईंट पत्थर दिखते नहीं, बवाल कर गुजर गया ...  

..
कलकल करता होगा 'कल', नहीं छलेंगे कोई छल  
ऐसी आशा प्रतिदिन मेरी वो हलाल कर गुजर गया ..
..
आते  जाते रहे ऋतू , छोड़ गए वे मनमें किन्तु 
कांटे साबुत टहनी पर, फूल मसल कर गुजर गया ..
..
घरवालों का क्या कहना, दुश्मनों से है याराना
हासिल था जो कुछ मिला वो फिसल कर गुजर गया ....
..
महफ़िल में आया सही, पर कोई शिरकत नहीं
ना किसीने था पुकारा, बस टहल कर गुजर गया ...
..
रोज बदलता रहा वो बाट, खोजे नये नये थे घाट,
जहाँ भी ऊबा उसको छोड़, नई पहल कर गुजर गया  ... 
...
बस, एक बूंद की खुशबू से, अंकुर फूटे धरतीसे,
दूब का कोमल स्पर्श मिले... ये खयाल कर गुजर गया ...  


- श्रीधर जहागिरदार
१०-१-२०१२