बुधवार, २८ मार्च, २०१२

विसावा....


तुला जाणीले पहिल्यांदा मी रानाच्या काठी,
खुशाल होता झुलत कोवळ्या पानाच्या देठी...

कां नाकारू, भय अनामिक जळात थरथरले ,
रान पांखरू माथ्यावरुनी होते  भिरभिरले....  

वणवण फिरलो शोधण्यास मी माझा ध्रुव तारा,
क्षणभर देखील तुझ्या विचारा दिला न मी थारा... 

किती तुडवल्या रानोरानी नंतर बाभूळ वाटा,
कधी घडविल्या रक्त सिंचुनी नवीन पाऊल वाटा...

अंतरातले किती किनारे वादळ साहून पुरले, 
ऊर फाटले दर्याचे पण शिबाड शाबूत उरले,    

अटळ सावली परि तुझी ही नभ व्यापून उरली,
शिशिरामधली पानगळी कां वसंतात स्मरली...

दिसे अता मज रानामधला डोह चांदणे प्याला,
जरा विसावा घे .. नभातून मला इशारा आला...

 - श्रीधर जहागिरदार 
२६.०३.२०१२ 


रविवार, २५ मार्च, २०१२

म्हणावे कशाला...



मन व्यक्त पाहीजे, म्हणावे कशाला...
मग वृत्त जाणीजे, म्हणावे कशाला...

जर आस ठेवीतो प्रभू दर्शनाची,
मज भक्त पाहीजे, म्हणावे कशाला...

भर पेट मलीदा तरी हाव बाकी
मन शांत पाहीजे, म्हणावे कशाला...

पर छाटले रुढींनी, मन जायबंदी,
खग मुक्त पाहीजे, म्हणावे कशाला... 

मज भावली चित्तातली फकीरी
मग तख्त पाहीजे म्हणावे कशाला...




- श्रीधर जहागिरदार
२३.०३.२०१२ 

शुक्रवार, २३ मार्च, २०१२

कवितेची एक ओळ - अंगत पंगत

  


कवितेची एक ओळ
गोल गोल वळली,
पाकामध्ये बुडताच
जिलबीला कळली...

कवितेची एक ओळ,
मुठीमध्ये वळली,
मोतीचूर दाण्यागत
लाडवात रुळली....

कवितेची एक ओळ,
दह्यामध्ये सांडली,
कापडात बांधताच
श्रीखंडाशी भांडली...

कवितेची एक ओळ
दुधामध्ये नासली,
मऊ मऊ रसगुल्ल्यात
गोड गोड भासली ...

कवितेची एक ओळ
लांब लांब लांबली,
शेवयाची केशर वळी
दुधामध्ये थांबली...



- श्रीधर जहागिरदार
गुढी पाडवा,  २३ मार्च २०१२ 

रविवार, १८ मार्च, २०१२

कवितेची एक ओळ




कवितेची एक ओळ बावरी,
कुठेही रुजते, कुठेही हसते!

बाल्कनीच्या कुंडी मधले
फूल बनुनी कधी उमलते;
खिडकी मधले नभ चौकोनी
चांदवताना, तिथे उमगते;

कवितेची एक ओळ बावरी,
कुठेही रमते, कुठेही जमते!

कधी बटेच्या हिंदोळ्यावर
झुलता झुलता अलगद पडते,
गालावरती खुलता खुलता
लाजत लाजत खळीत दडते.

कवितेची एक ओळ सावळी,
अशी हरखते, अशी मुरकते !

कूर्म गतीच्या रांगेमध्ये
वीज गतीने मनी चमकते,
रेटारेटीत लोकल मधल्या
गुंजन अल्लड कानी करते,

कवितेची एक ओळ बावरी,
कुठेही रुजते, कुठेही ठसते!

बाजारी ती शृंगाराच्या
केविलवाणी पदी थिरकते;
आजारी वृद्धांच्या नयनी
कातर, एकाकी थरथरते

कवितेची एक ओळ कावरी,
कधी सरकते,कधी थबकते!


भीक मागते हात कोवळे
रस्त्यावरती, मन चुटपुटते;
दंगे, हत्या, पेपरातुनी
वाचत असता, मन पुटपुटते;

कवितेची एक ओळ मनस्वी
कुठेही दिसते, कुठेही असते !

भेट अचानक: "किती वर्षांनी?
असतोस कोठे ? आहे कां स्मरते?
कशा चालल्या तुझ्या कविता?
ह्यांना नेहमी सांगत असते"

कवितेची एक ओळ पुराणी
खुदकन हसते, मनात सलते!!

कवितेची एक ओळ पोरकी
अर्था मुकते, वहीत सुकते !!


- श्रीधर जहागिरदार 
१२.०३.२०१२.

शुक्रवार, ९ मार्च, २०१२

इथे असेच चालते...


दहशतीत जीवनाचे नित्य रुटीन चालते,

घालमेल वाढते ... इथे असेच चालते...

मोहाचे रतीब टीव्ही रोज नवे घालतो
मागण्या अनुषंगे ऐकणे मी टाळतो,
रुसवे नि फुगवे अन वादांचे फावते,
घालमेल वाढते ... इथे असेच चालते...

संपाचे अस्त्र कुणी नित्य इथे उपसते,
घाईच्या वेळेला नेमके खुपसते,
कामाला जाताना रोज असे धडधडते, 
घालमेल वाढते ... इथे असेच चालते...

एकतर्फी प्रेमाने चेहरे किती कुरुपती,
"लेक माझी वाढली", आईला धासती,
"तासाला फोन कर" सारखी बजावते,
घालमेल वाढते ... इथे असेच चालते...

रेव्ह पार्टी जंगलात पेपरात वाचतो,
पोराची वाट बघत रात्र रात्र जागतो,
चढे बिपी बायकोचे, शुगर माझी वाढते,
घालमेल वाढते ... इथे असेच चालते...

मन:शांती मिळण्याला होती कधी मंदिरे,
स्फोटांचे कुटील डाव आज  तिथे रंगले,
प्रार्थना करण्यास तिथे आज ना धजावते,
घालमेल वाढते ... इथे असेच चालते...

इथे कसाबी माणसांचे पीक रोज वाढते 
घालमेल वाढते ... इथे असेच चालते...
इथे अस्सेच चालते...   

- श्रीधर जहागिरदार 
२५.०२.२०१२  



मंगळवार, ६ मार्च, २०१२

धरबंद असावा....


 

दरवाजा कां घराचा बंद असावा
आशिकांचा मेळावा छंद असावा!

भ्रमरांचे गुंजारव गुंतवी मना,
वाटले उगा तिथे मकरंद असावा!

बोलतो मधाळसा तुज भेटता मुका,
विरघळला अधरात गुलकंद असावा!

ते कटाक्ष, ती अदा, घायाळ जाहलो,
त्या क्षणी गमले मला धरबंद असावा!

कां उगाच शोधतो बाहेर दिलासे,
अंतरी खोल खरा आनंद असावा!

सोनेरी पिंजरे हे खुणावती जगी
पक्षी मनाचा नभी स्वच्छंद असावा!

- श्रीधर जहागीरदार
२५ .२ २०१२

तू असावे ...

झुंजून येता कधी वादळाशी, किनारा बनुनी तिथे तू असावे 

अंधारवाटा अशा जीवघेण्या, देण्या सहारा इथे तू असावे...


संपेल कैसी तुझी रे ही दैना, मनातून केले तुला हद्दपार, 

दंग्यात ठरते तुझे नामधाम, मंदिर मस्जिद कुठे तू असावे... 


"ओठात आली नवी क्रांतीगीते, पुनः पेटणार मशाली नव्याने" 

होणार शामिल नक्की तुला रे, मागून येतो पुढे तू असावे...


गल्लीत दंगे निवळले जरी, निखारे मनातील कसे ते विझावे 

भाऊच व्हावे वैरी जीवाचे असे पाडले तीढे तू असावे... 


फेडीत देणे जुन्या ह्या दिशांचे शोधीत तारा "श्री" भटके अजून, 


संकेत दिसतो असा जीवनाचा, जिथे नसे मी तिथे तू असावे...


- श्रीधर जहागिरदार 

२५.०२.२०१२