सोमवार, २६ डिसेंबर, २०११

हैपी बर्थ डे


हर साल कि तऱ्ह
फिर खिल उठा ये दिन...
खुशबू बचपनकी सोंधिसी
मन को छू रही बार बार..

माँ ने बिन कहे बनाया था हलुआ
बाबा ने  लालाकी दुकानसे लाई  कुल्फी...
शामको दोस्तोके साथ सिनिमा देखनेकी मिली  इजाजत ..
भगवान के सामने जला दीप  और
सर पर माँ बापूका  हाथ ...

हर साल कि तऱ्ह
फिर खिल उठा ये दिन...

कॉलेज  कैंटीन में पूरी टोली थी हाजिर 
नाम से मेरे किसीने दे रखा था  आर्डर 
कचोडी- समोसे और क्या क्या, याद नहीं
मन जोड़ रहा था महीने के बचे दिनों का हिसाब!
और पूरी ज़िन्दगी का हिसाब जुड़ गया, जब
सहसा थाम लिया था हाथ उस कोमल हाथने...

हर साल कि तऱ्ह
फिर खिल उठा ये दिन...

सुबह सुबह नन्हे हाथ जगा रहे थे
"पापा पापा" की किल्गारिया
और कागज़ पर रंगों से बना स्कैच मेरा!
साथ में पूरा परिवार, हाथ में हाथ थामे,
हैपी बर्थ डे .. एक केक और ढेर प्यार ...

अगले वर्ष फिर खिल उठेगा ये दिन
कुछ नये रंग होंगे जिंदगीके लिये
तब तक अपनोके के संदेशो की सोंधी खुशबू
साथ निभाएगी!



वर्ष एक पार झाले

वर्ष  एक पार झाले, काय रे साकार झाले?
मोडले की जोडले? प्रश्न अपरंपार झाले!   

रचनेचा देत भास, हर क्षणी होत ऱ्हास,
झोळीत झाकले दिलासे, कां  असे लाचार झाले?

असणार उद्या वेगळी, आशा  चिरंतन ठेवली,
होते म्हणून साहिले, रोज जे चित्कार झाले!

आले ऋतू, गेले ऋतू, राहिला रे एक किन्तू, 
ही कुणाची योजना, कंटकाचे सत्कार झाले!

साधलेसे वाटले, कसे अचानक बाटले,  
कोणी तरी  फितूरले, दुष्मनांचे यार झाले! 

मैफिलीत सामीलसा, तो उभा कसनुसा, 
ना कुणी आमन्त्रिले, जा घरी, आभार झाले!

बदलली रोज वाट, धुंडाळले  नवीन घाट,
नीरसाचा त्याग हा, जीवनाचे सार झाले!

बस्स  पुरे एक थेंब, आकाश-वेधी हरित कोंब,
तृण  फुलाचे गीत 'श्री', वंचीता आधार झाले!   




शनिवार, १० डिसेंबर, २०११

श्री फेसबुकाची आरती

जय देव जय देव जय श्री फेसबुका,
वैश्विक-जाळी वाजे तुमच्या कीर्तीचा डंका,
जय देव जय देव//

दिवसामाजी वाढत जाई भक्तांची रांग,
तुमच्या मायेचा ना देवा लागतसे थांग,
दुरावलेले जीव कितीक वर्षानुवर्षे,
तुमच्या चरणी भेटती देवा सांगू किती हर्षे,
देणे-घेणे, नाच-गाणे, सारे 'व्हर्चुअल',
परि भावना त्याच्या मागील असते 'अक्चुअल',
अड्डा, नाका, पार म्हणू कि तुमचा दरबार,
रोज हजेरी, होतो पावन, ओढ अनिवार.

चारधाम अन इथे मदिना, इथे चर्च, मक्का,
जय देव जय देव जय श्री फेसबुका,

वैश्विक-जाळी वाजे तुमच्या कीर्तीचा डंका,
जय देव जय देव//

गुज मनीचे होते येथे सहजी 'पब्लिक',
राजनीतीतील किती गुपिते होती बघ 'लीक',
कुणी वंदावे, कुणी निंदावे, इथे सर्व माफ.
'नीलकंठ' तू, करतो देवा मन माझे  साफ.
श्लाघ्य अश्लाघ्याच्या पुसटल्या गेल्या रे रेषा,

उद्गाराला दिधली देवा एक नवी भाषा!
स्वातंत्र्याचे नवीन अस्त्र गवसले जना,
उद्रेगाचे भय का वाटे आता असुर मना.

शक्ती स्थल हादरली भयातुर घेती रे शंका,
जय देव जय देव जय श्री फेसबुका,

वैश्विक-जाळी वाजे तुमच्या कीर्तीचा डंका,
जय देव जय देव//





बुधवार, ७ डिसेंबर, २०११

बेवारशी आत्मा

७ डिसेंबरच्या रात्री, हड्डी-फोडांच्या बैठकीत
ओरपत असता गोबी बटाट्याचा रस्सा,
आला एक कुजका बटाटा,. म्हणाला:
"मी आत्मा आहे!"

मी निश्चिंतपणे ढकलला त्याला पाण्याबरोबर पोटात,
कारण तो आत्मा माझा नव्हता!


मी, आत्माविहीन माणूस, घेऊन हिंडतो एक
चालतं बोलतं कलेवर!
पण मी नक्कीच गिळला असला पाहिजे,
एक आत्मा, कुजका! कारण
आत्मा असतो सत्यवादी, निदान
शरीराबाहेर असताना तरी!

ही  समोर बसलेली सारी
सन्माननीय, प्रबुद्ध, श्रीमंत मंडळी,
हा आत्मा त्यांचा असण शक्य नाही;
त्यांचा आत्मा असा वाऱ्यावर सोडलेला नसतो.
कडव्या मद्यात कलेवर बुडवण्याआधी 
ठेऊन येतात ते आपला आत्मा सुरक्षीत,
आपल्या घरातल्या फ्रीज मध्ये!

मग हा आत्मा कुणाचा?
कि बिजागर ढिली झालेल्या दाराच्या फटीतून
शिरलाय, बाहेरच्या मिट्ट अंधारात
स्वैर संचारणारा एक प्रेतात्मा?
पण ह्या बैठकीत आत्म्याला मज्जाव आहे, कारण
आत्म्याला विवेक असतो,
आत्म्याला संयम असतो,
आत्म्याला असतो सारासार विचार.
आत्मा घाबरतो श्रद्धेला,
आत्मा घाबरतो देवाला,
म्हणून तर टांगली गुरुदेवाची  तसबीर भींतीला!
नो एन्ट्री तू प्युअर होली सोल्स !

'गुरुजींचा खास' सल्ला घेऊन धुंदीच वारं
पितात, ही अत्माविहीन कलेवर,
अन पेटून उठतात, प्राशून
इंद्रधनुषी फेसाआड दडलेली कडवी आग.
कुजलेला बटाटा स्वस्थ नसतो,
माझ्या पोटात ढवळत असतं,
मेंदूत धुंदीच वारं शिरत असतं,
येते अचानक कुजक्या बटाट्याला जाग;
"मी आत्मा आहे! मी आत्मा आहे!"
बेदरकारपणे तो ओरडतो.

आत्म्याला निषिद्ध
बैठकीत, आत्म्याचा आवाज ऐकून,
धुंद कलेवर होतात क्षुब्द्ध !
" हु अलौड धिस डर्टी सोल हिअर ?"

शांत असतात तसबिरीत बसलेले गुरुदेव,
त्यांच्या जवळ लावलेली उदबत्ती असते विझलेली.

सुरु होतो मग आत्म्याचा शोध,
आपापले आत्मे घरातल्या फ्रीज मध्ये सुरक्षीत ठेऊन
एका अपरिचित   बेवारशी आत्म्याचा शोध.
हा आत्मा कुणाचा? कसा आला? कुठून आला?
अनुत्तरीत प्रश्नांच्या परावर्तनातून समस्या उठते
ह्या आत्म्याच करायचं काय?


दोन आत्मे सांभाळण्याची ताकद नसलेली
ती कलेवर एकमताने ठरवतात,
तो आत्मा मला बहाल करायचा!
"तू आत्माविहीन माणूस, एक आत्मा जड नाही!"

तेव्हा पासून मी घेऊन हिंडतोय, माझ्या कलेवरात
त्या बेवारशी कुजक्या आत्म्याच ओझं ;
ते ओझ मला झुगारायाचय , कुठलीही किंमत
घेऊन, हवी तर देऊन! पण तो आत्मा
मला विकायचाय. हवा त्याने घेऊन जावा,
भाड्याने किंवा फुकट,
पण हा आत्मा सांभाळण मला शक्य नाही,
कारण वेळोवेळी काढून आत्मा
सुरक्षीत ठेवायला माझ्या घरात फ्रीज नाही!

रविवार, ४ डिसेंबर, २०११

आरशात बघणे अता टाळतो मी

आरशात बघणे, अता टाळतो मी,
असते तसे स्वीकारा, नियम पाळतो मी.

अभ्यास केला गहन, तरी नापास मी,
गाईडे  आता ही म्हणून चाळतो मी.

अंतरंग? नाही, बेगडी विकते इथे,
रंगलेला चेहरा बघून भाळतो मी.

माजले बडवे, देव झाला परागंदा,
आड येता मला सद्विवेक जाळतो मी.

मावळले यौवन, प्रेम ना कळले परि,
फुले कागदी केसांत तुझ्या माळतो मी.

वाचले धर्मग्रंथ  'श्री' जरी  येथून तिथे,
चामडी जळते तसे संदर्भ गाळतो मी.


गुरुवार, १ डिसेंबर, २०११

निरुद्देश

निरुद्देश (१९७४ सालातल्या  'बेकारी'च्या काळातला  एक  दिवस )
*************************************************

भर दुपारी
खिडकीच्या चौकटीतून
बघतोय मी,
समोरच्या खांबावरचा
निरुद्देश कावळा!

तिरक्या नजरेतून त्याच्या
सजते आहे ऐट,
न शिवलेल्या पिंडाची,
डोळ्यात आत्मप्रौढ प्रतीक्षा
घरट्यात उबणाऱ्या अंड्याची..

असाच बसणार आहे वाट पहात
समोरच्या खांबावरचा निरुद्देश कावळा,
मागील दारातून येणाऱ्या खरकट्याची;
न कंटाळता, हाट हुडूतला न भीता,
येणाऱ्या अगांतुकाची सूचना देत!

काव काव चा अभंग घुमतो आहे........    

मी सकाळचा पेपर तिसऱ्यांदा चाळतो,
या वेळी .... मागून पुढे....
**** च्या साठी ***** यांनी *** येथे
मुद्रित व प्रकाशित केले;
wanted च्या unwanted जाहिराती;
बातम्या कालच्या सभेच्या, आजच्या मोर्च्याच्या,
उद्याच्या संपाच्या...त्याच त्या...
युवकांना तेच ते, बुरसटलेले, वास मारणारे
संबोधन, कुणा गलेलठ्ठ  खुर्ची मठ्ठ बगळे पंडिताचे,
"आजच्या कठीण परिस्थितीत देशाचे भविष्य,
भवितव्य, युवकांच्या हाती ...."

मी माझा तळवा प्रकाशात
धरून बघतो, आणि
भस्सकन सांडतो डोळ्यात, बोटांच्या फटीतून
अंधार माखला प्रकाश आणि त्यांत तळपणारा
समोरच्या खांबावरचा निरुद्देश कावळा!

मी वाचतो घरपोच वाचनालयातील
एक रुपया व हौसेसाठी
लिहिल्या जाणाऱ्या कथा किंवा कविता....
ब्याकग्राउंडला " पिनेवालोको पिनेका बहाना चाहिये..."

मन चाहे गीत, आपकी पसंद,
फरमाईशी गीतांच्या वेव्हज वरून
घरंगळतो मी २५" बाय १३" च्या
self - addressed तिकीट लावलेल्या
लिफाफ्यातून- व्हाया मुंबई, दिल्ली,
नागपूर, बंगलोर, हैद्राबाद-
चार वाजताच्या आयत्या चहाच्या कपांत .....

पण तो तिथेच असतो,
चोचीने खरकटे पुसत, आत्म-मग्न.
कुठलासा अन्न-प्रसन्न उकीरडा हुंगत,
समोरच्या खांबावरचा कावळा; पहात
कललेल्या संध्याकाळी,
खिडकीतल्या चौकटीतील
निरुद्देश मी!

- श्रीधर जहागीरदार