रविवार, ३१ मार्च, २०२४

मी

तुला समजून घेताना
जरा बाजूस होतो... 'मी'.

सुखाचे चोचले पुरवत
क्लेश जिरवून घेतो मी.

कुणाशी वैर नव्हते पण
स्वतःचा मित्र नव्हतो मी.

विनासायास मिळते जे
फुका मिरवून घेतो मी.

तमाची कां करू चिंता?
दिवा होऊन जळतो मी.

भरारी उंच घेताना 
धरेचा दूत असतो मी. 

- श्रीधर जहागिरदार

गुरुवार, २१ मार्च, २०२४

जळ थरथरले

कसे तू म्हणशी  हातून कधी ना घडले भलते
जे घडले, अनवधनाने, ते अजून आहे सलते,

त्या वाटेवरुनी जाता का उगाच जळ थरथरते ?

श्रीधर जहागिरदार 
१५.३.२०१३

तुम खुदकुशी नही कर सकती

तुम बेचैन हो सकती हो 
बौख़ला नहीं सकती 
तुम लड़खड़ा सकती हो 
स्वयं गिर नहीं सकती। .. 

तुम नाराज़ हो सकती हो 
गुस्सा कर नहीं सकती 
किसी कोने में दुबक सकती हो 
दहलीज़ लाँघ नहीं सकती 

रहस्यों की गुत्थी सहेज सकती हो 
सहज उजागर कर नहीं सकती 
हाँ, तुम कविता हो सकती हो 
नही, कहानी हो नहीं सकती 

हत्या हो सकती है तुम्हारी 
तुम ख़ुदकुशी कर नहीं सकती

- श्रीधर जहागिरदार

अंतर्नाद


एक विदुषक माझ्या आतील 
सोडत नाही पाठ
असह्य होता उरी वेदना
कणा ठेवतो ताठ.

सुश्रृताच्या हाती देता
देहाची सारंगी 
विदुषकाच्या गळ्यात घुमते
धून नवी श्रीरंगी

ग्लानी मध्ये ऐकत असता 
मी धीराची वाणी
खुशाल बसतो आत विदुषक 
गात पोपटी गाणी.

अविरत चाले वटवट याची
आत कसा हा आला
ओळख पटली विदुषकाची 
अंतर्नाद गवसला.

- श्रीधर जहागिरदार

खिडकी

एक खिडकी असते कविता 
आत काय असेल याची उत्सुकता 
चाळवणारी, 
असलाच पडदा तिच्यावर 
तरी अदमास करायला लावणारी.

कविता असते एक खिडकी 
आश्वासक गज लावून 
अंतरंग सुरक्षित ठेवत 
संवाद साधणारी.

कविता एक खिडकी असते 
किलकिली, 
संदर्भ न देता, भिंतीवर टांगलेल्या
तसबीरी दृष्य-अदृष्य करणारी. 

कविता खिडकीत वसते.
खिडकी कवितेत असते.

- श्रीधर जहागिरदार 
२१ मार्च २०२४