गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

विठू


विठू माझी माऊली
विठू माझी स्माइली
विठू करे गुजगोष्टी
विठू असे फ्रेन्डलिस्टी
विठू झालो कासावीस
धाड आजचे स्टेटस
विठूचा मी पाईक
त्याचे सारे लाईक
एकादशी मेसेज केला सेंट
विठू पटकन दे कमेंट


- श्रीधर जहागिरदार

ह्यॅप्पी बर्थडे



तिने पाहिल्या आणि ऐकल्या
Happy Birthday च्या घोषणा
आणि त्यांची विचारणा
" पाहिलंस ना, किती प्रेम करतात सारे
तुझ्यावर"  ऐकून ती मंदशी हसली
(असे वाटते)
" तुला उगाचच वाटायचं, आपल्याकडे
दुर्लक्ष करतात सारे…. एकटे पडलो आहोत आपण"
सारेच मग आळीपाळीने काही बाही बोलत राहिले
तिच्या कौतुकात
( असे वाटते )
आलिशान सोफ्यावर ती आणखीनच अवघडली ,
मन हिंदोळत राहिलं दूर कुठल्याश्या
सुखदाम झोपाळ्यावर
(असे वाटते)
अचानक कानावर पडले तिच्या
" अरे कुठे होतास  तू ? चल हो पुढे आणि म्हण आज्जीला
happy birthday ... "
एकदम वाढला घोषणांचा गल्ला
happy birthday .....  happyyy birthdayyy ...
 
कोलाहलात विरून गेला तिचा क्षीण आवाज
" सांभाळून रहा रे…  समजुतीने धरून  एकमेकांना"
(असेच काहीसे)

समोरचा पडदा झाला निश्चल, निरव
ती उठली, निघाली संथपणे
आपल्या खोलीकडे, आश्रमातल्या !!!

  - श्रीधर जहागिरदार