गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३

सुख प्रवासी प्रवासी


सुख प्रवासी प्रवासी
दु:ख असे रहिवासी …

सुख निरंतर शोध
दु:ख शाश्वताचा बोध …

सुख चौकटी कोंडले
दु:ख गगनी मांडले  …

सुख चांदणी आभास
दु:ख तेजाचा दे ध्यास ...

सुख चिमुट चिमूट
दु:ख पसरे मुकाट …

सुख अळवावर थेंब
दु:ख डोळ्यात ओथंब …

सुख स्वत:शी साठव
दु:ख देवाचा आठव …

- श्रीधर जहागिरदार
२८ आगस्ट २०१३

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३

संध्याकाळ - तीन विचार


संध्याकाळ - तीन विचार

सुटणे जुळणे घडते जेथे
तिथे उसवते शिवण मनाची
रुखरुख हुरहुर ग्रासून जाते 
होता संध्याकाळ कुणाची …
दिवस आजचा गेला, सुटला
दान तयाचे उरले हाती,
तेच घेउनी उडेल रावा
कुण्या दिशेला तोडून नाती …
झाली संध्याकाळ पेटवा
पुन्हा नव्याने स्वप्नदिवे,
भेदून कातळ अंधाराचा
मनास फुटू द्या कोंब नवे …


- श्रीधर जहागिरदार
   १-७-२०१३   




शनिवार, १० ऑगस्ट, २०१३

घेतला कैवार आहे

गोंधळाला पार आहे
तूच तो आधार आहे  ….

आरसा घेऊन आलो
त्यांत कां तक्रार आहे? ….

थंडशी झाली विधाने
पोळले जिव्हार आहे  …

घेतली लाठी निघाले
मारण्या जो ठार आहे …

पत्थराचा देव होता
घेतला कैवार आहे …

कौतुकाचे ताट मांडा
'श्री' अधाशी फार आहे …

श्रीधर जहागिरदार
१० आगस्ट २०१३

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

हसणे



 

हासता मी भासतो भित्रा ससा
कां कुणाला वाटतो छद्मी असा?

तोंड का वेंगाडता मी हासता
हासणे हा फक्त का तुमचा वसा?

रोज मरते त्यास नां कोणी रडे
हासणे हे मानतो माझा ठसा !

हासणे ओठावरी ना माझ्या जरी
ते बघावे नेत्रात माझ्या राजसा

हासता मी, हासले नाही कुणी
हासण्याचे हो हसे, सांगू कसा …

- श्रीधर जहागिरदार
२ आगस्ट २०१३