शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

एक्झिट

राखेमधूनी पहाल नक्की
होईल पक्षी बहाल नक्की...
 
वाटेत काटे सजावटीला,
तूझाच आहे महाल नक्की ...

देशोधडीला सुखास लावा
तेंव्हा खुषीने रहाल नक्की...
 
भेटून येता लगेच बाधा !
ओठांमधूनी जहाल नक्की ...

तुम्हास भासे "उद्या सुखाची"
दु:खे अजूनी सहाल नक्की...

विषाक्त गंगा, विषाद नाही
कुंभास तेथे नहाल नक्की...

एक्झिट होता विदूषकाचे
डोळ्यात अश्रू वहाल नक्की ...

"श्री" तू जरीही प्रयास केला
निसटून गेला खयाल नक्की...



- श्रीधर जहागिरदार
१०-०२-२०१३

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

कां गुन्हे अभिमान झाले...


घात झाले, प्रतिघात झाले,
सांत्वनाचे आघात झाले....

भास झाले, आभास झाले
स्पष्ट होता उपहास झाले...

भिन्न झाले, कभिन्न झाले
टिपुर जेव्हां खिन्न झाले....

क्षुब्ध झाले, प्रक्षुब्ध झाले
लोळ उठता हतबुद्ध झाले ....

मान झाले, सन्मान झाले,
कां गुन्हे अभिमान झाले...

-श्रीधर जहागिरदार
१२-०१-२०१३

पाऊस ..


अचानक भरून आलं ..
अचानक भरून आलं आकाश ...

मी ऐकत बसलो होतो तलत, त्या संध्याकाळी..
हृदय पिळवटून काढणारे शब्द
"है सबसे मधुर वो गीत..."

तू उठलीस आणि ...
निघूनच गेलीस ...

पाऊस घनघोर ....
वस्तीला आलेला तुझ्या डोळ्यांत...

परतलीस आणि झटक्यात बंद केलेस तू गाणे

पण, हा पाऊस? त्याच काय?
तो बंद करण जमेल तुला?

- श्रीधर जहागिरदार
जाने २०१३