गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

गोळा बेरीज



गोळा बेरीजच करायची
तर तू आहेस, ते सर्व :
तुझी कृत्ये, तुझे विचार,
तुझे बोल, तुझी स्वप्ने,
तू टाळलेले, तू कवटाळलेले,
तू त्यागलेले, तू भोगलेले,
तू स्विकारलेले, तू नाकारलेले,
तू साहिलेले, तू वाहिलेले,
तू जपलेले, तू पळवलेले,
तू मागितलेले, तू ओरबाडलेले,
तुला वारसाहक्काने मिळालेले,
तू कमावलेले, तू गमावलेले,
तुझ्या गरजेचे, तुझ्या मर्जीचे,
तुझ्या द्वेषाचे आणि तुझ्या प्रीतीचे ...
नाही टाळू शकत स्वतःला
तू सत्वशील आहेस,
तसाच हरामखोर आहेस !
ब्रह्मानंदात वेळ घालवला आहेस तू
शोकाकूल विलापात दिवस कंठले आहेस तू !
तू आहेस तुझा आत्मा !
तुझा देह निव्वळ एक पात्र आहे- स्वतःच्या फसवणुकीत गैरवापर झालेले, दुर्लक्षित झाल्याच्या कळकट खुणा दाखवणारे, आत्म-शोध आणि आत्म-स्विकाराला असलेला तुझा प्रतिरोध प्रतिबिंबित करणारे !
इतर सर्वांना जे ठाऊक आहे त्याच्याबद्दल वाद घालण्याचा काय उपयोग?
जे तुझ्या मनाला ठाऊक आहे ते नाकारण्यात कसला फायदा आहे?
तू आहेस तेव्हढाच तू चांगला आहेस आणि तुझे दोष अमाप आहेत.
चल, स्वत:चा स्वीकार कर.
आता कुठे उजाडलंय आणि नव्याने खेळायला भरपूर वेळ जवळ आहे
- (आधारीत)

मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८

बोकड कथा



# बोकड कथा
निरुंद पूल
खाली दरीतून वाहत जाणारी
लालसर खळाळती 'दूधी' नदी.
सूर्योदयापूर्वी
माझं त्या पार जाणं आवश्यक
आणि
तुझं ह्या पार येणं गरजेचं
एकाच वेळी...
दोघेही बरबटलेलो
अद्याप, तसेच,
साला, बोकडाचा जन्म मिळायला हवा होता !
- श्रीधर जहागिरदार

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

अनुग्रह



तुझ्या दु:खाचं मी काय करु?
भाषांतर?रुपांतर?अनुवाद?

त्याचं ह्या कशाने निवारण होणार नाही.
त्यापेक्षा तुझ्या दु:खाचा मला अनुग्रह दे, 
आपण दोघे समाधिस्थ होऊ.

- श्रीधर जहागिरदार 
१९-११-२०१८

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

जीवघेणे गात आहे



हे कुणी जे आत आहे 
जीवघेणे गात आहे ... 

व्यस्त ते व्यापात त्यांच्या  
लाघवी पण नात आहे...  

रोज खाते  माणसाला   
माणसाची जात आहे ...  
कोरडा व्यवहार रात्री  
हे मनाला खात आहे ... 

मित्र होता सोबतीला   
वाटले ना घात आहे... 

जावयाला पेच मोठा  
जे नको.. ताटात आहे ...  

तो नव्या रूपात नक्की  
ही इथे बघ कात आहे ... 

वाढवावी गस्त आता 
नागरी उत्पात आहे...  

- श्रीधर जहागिरदार 
१६/११/२०१८

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८



इतिहासाचे
असतात व्हर्जन्स ,
व्हर्जन १ : बापाच्या कथेतले
व्हर्जन २: आईच्या व्यथेतले
(किंवा उलट - पालट)
त्यावरून औलादी वाद घालतात
विभागल्या जातात
लिहू लागतात वर्तमानात
भविष्यासाठी : व्हर्जन ३ !
- श्रीधर जहागिरदार