मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

वेशीपाशी रहाताना


वेशीपाशी रहाताना
जगता येत नाही स्वस्थपणे...
दोन्ही कडून येणारे वारे
वाहून आणतात धूळ
द्वेष भरल्या दहशतीची !...

वेशीपाशी राहणाऱ्याला असते
निश्चित अशी एकच ओळख
संशयिताची,
आणि ती कायम ठेवण्याचा
खटाटोप दोन्ही कडून !...
वेशीपाशी राहणाऱ्यांचा
इतिहास असतो पिढ्यापिढ्यांचा,
इकडच्या आणि तिकडच्या सोयीने
वेळोवेळी लिहिलेला; 

मात्र नसतो त्यांचा आपला भूभाग
सुईच्या अग्रा इतकाही
चुंबून नमन करायला !

- श्रीधर जहागिरदार

रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

अखेर


वीसेक  हिरवीगार रानं 
पाच पंचवीस खळाळत्या  नद्या 
सातेक लहान मोठे डोंगर 
पार करून अखेर पोहोचलो 
अमर्याद वाळवंटात ... 

तिथे पाहिला  एक पारदर्शक विदूषक 
सूर्याच्या सावलीत, नृत्यमग्न झालेला ... 

माझ्या कोरड्या जिभेवर त्याने टाकले 
चार थेंब डोळ्यातले 
आणि भाजलेल्या वाळूचे चटके चुकवताना 
मीही दिसू लागलो नृत्यमग्न  , 
आणि पारदर्शक ... 

मृगजळाचा  साक्षात्कार झाल्यासारखा !

- श्रीधर जहागिरदार 

बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

ऐतिहासिक




मी त्याला विचारले:
त्याच्या अंगणात सडा पडलेल्या
नाजूक पारिजातकाच्या फुलांना
त्वेषाने पायी तुडवण्याचे कारण ... 

फुलांवर थुंकत तो उत्तरला :
ह्याची मुळे शेजारच्या अंगणात 
खोल रुजलीत ;
आणि त्यांच्याशी आमची 
ऐतिहासिक दुश्मनी आहे !!

- श्रीधर जहागिरदार 

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

चाहूल

चाहूल कशाची आहे... ?
ही भूल ... तुझी तर नाही?
धूसरशी वाट अशी कां
मज ओढ लावुनी पाही ...

स्मरणातुन ओघळताना
ही बोच कशाला उरते
पानातुन सुकली बकुळी
वाऱ्यावर अलगद उडते ...

भवताल अशातच उधळे
धूपाचा दर्प कुठुनसा
कोलाहल झांज रवाचा
हो श्वास जरा कातरसा...

विस्तारत जाती अंतर
बीजातुन फुलता नाती
जे फूल उरावे तरूवर
ते गळते शोधत माती ...

- श्रीधर जहागिरदार
२९ आगस्ट २०१७

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

तोवर आशा आहे



अचानक झोप उघडली
घामाघून झालेला मी
तांब्याभर पाणी पिऊन
खिडकीशी गेलो  …

कुंडीतले गुलाबाचे रोप 
एक नवी कळी जोजवत होते
नेहमी सारखेच …

तेव्हढाच दिलासा !

जोवर अंगणातल्या झाडांना
बंदुकीच्या फांद्या फुटत नाहीत
आणि ती लगडत नाहीत बुलेटसने
तोवर आशा आहे …


- श्रीधर जहागिरदार

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

सुरक्षित

सुसाट वाहत जाणाऱ्या रस्त्याने 
आपला जीव वाचवत रस्त्याने जाताना
सत्तरी गाठत असलेल्या त्याने
शोधून काढला फूटपाथ चालायला
सुरक्षित वाटले त्याला ...
मात्र क्षणभरच..
फूटपाथ तुडवत झेंडा मिरवत
समोरून
एक मोटरसायकल आली मुर्दाड ..
तो लटपटला ...
मुरलेल्या सवयीने
दुसऱ्याला वाट द्यायच्या प्रयत्नात
आपटला पानपट्टीच्या दुकानावर
तर बसला चटका वैधानिक चेतावनीचा !
"रस्त्याच्या डाव्या हाताने चाला, काका,
नियम पाळा आता तरी" हिणवत
झेंडे फडकावत निघून गेली फटफटी
चालू लागला मग तो
तोंड फिरवून
नियमाला धरून
रस्त्याच्या डाव्या बाजूने
आपला मुक्काम विसरून !!

- श्रीधर जहागिरदार

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

खुळेपण



मी चार अक्षरांशी खेळतो;
आणि तू त्यांना आकाशी
नेऊन जोडतेस
हे तुझे आकाशपण !!

मी सात रंग उधळतो;
ओंजळीत गोळा करून
तू त्यांचे शुभ्रपण हुंगतेस
हे तुझे धवलपण !!

हे असले खुळेपण जपत
चालतो आहोत
आपण स्नेहयात्री .....

- श्रीधर जहागिरदार

शनिवार, ७ जानेवारी, २०१७

दर्शन


मी जेंव्हा चवताळतो
ती वेळ असते
खोल आत
चाचपडून बघायची ...
नेमके कुठले कुसर
टोचतय आत
जुन्या न भरलेल्या जखमेला ?
कि आहे एक
न वितळलेला दंभ
आंधळेपणाने कुरवाळलेला ?
हीच वेळ असते
बुरशी धरलेल्या धारणांना
 प्रखर ऊन दाखवायची
आजच्या वास्तवाला ,
 बदललेल्या आव्हानांना
धारणांच्या आवरणाखालील
शाश्वत मूल्यांच
दर्शन घडवण्याची !!
आणि नव्याने जगण्याची
निखळ माणूस म्हणून ...

- श्रीधर जहागिरदार
७ जानेवारी २०१७