रविवार, १४ मार्च, २०१०

कैफियत

मान्य, हैराण आहात पाहून
माझ्या डोळ्यातले अथांग शुन्य।
मात्र नाही हे, माझ्या निर्लज्ज
बेछूट, गांजेकसपणाचे पाप
हा तर तुमच्याच दांभिक पाखंण्डाचा शाप!
ज्याची वेळोवेळी दिलीत ग्वाही
ते निलघन आकाश,
खुद्द आहे निरस्तितवान निराश...
पायाखालिल काळी टणक
धरतीच दुभंगलेली,
समाधी कळसांच्या
केशरध्वजांची भंगलेली।
पडसादात उमटती, वारयाचे  निश्वास
इथे तिथे भरलेले शुन्याचे आभास ..





भंग अभंग



मना लागले अंधाराचे खूळ,
व्यथेची चूळ, मुखी असे।

अस्तित्व स्वत:चे दावी वाकुली,
जीर्ण सावली, फक्त हसे।

गळून पड़ती पिकल्या आशा,
पालवे निराशा, निष्पर्णातुन।

सबल तनी वसे खुजावले मन,
जगतो जीवन, मी मरणातुन।

गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

भान




मुखी राम नाम, तरी झाला धोका,
आता माझा सखा, सखाराम*।

आजवरी बोल, बोललो सरळ,
ओकीन गरळ, आता सारे।

तत्त्व, मूल्य, निति, सत्यावरी  निष्ठां।
आता तिथे विष्ठा टाकीन मी।

साध्या या जिण्याचे, मोजले मी मोल,
आता कां मी तोल, सावरावा।

आता मी जाणोनी, बांधलासे चंग,
असंगाशी संग, ठेवणार।

सखाराम बाईंडर

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९

डार्लिंग




यस डार्लिंग? That's enough?
ठीक आहे।
ओह नो ;
फुटली कांच सांधण्याचा
करू नकोस आटापिटा,
हात रक्ताळतील ते तुझेच
उगाच होइल चौकात बोभाटा।

यस डार्लिंग? ...
डोंट वरी
हळव्या दंवाच्या आयुची
कल्पना आहे मला
I am that much sport
तुझ्या माझ्यातच
राहिल हा मामला।

दयाट्स इनाप्फ़ . .
मात्र विसरु नकोस जाण्याआधी
चेहरयावर फिरवायला पफ ॥

यस दयाट्स सर्टन्ली इनप्फ।

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २००९

परिघ



एकदा सहज विचारल चंद्राला,
अमावस्या- पौर्णिमा, पौर्णिमा- अमावस्या करुन
कंटाळा येत नाही का तुला?
"काय करणार मग ?",
तो उत्तरला:
"काळतोंड्या म्हणुन चिडवतात अवसेला,
कलेकलेने म्हणुन करतो
मी पुनवेचा प्रवास;
वाटतं पुनवेला तरी धन्य पावेन मी ...
पण टिपुर चांदण्यातही दिसतात यांना
फक्त डाग जुन्या अवसेचे,
अन कलंक्या म्हणतात मला।
मावळतिच्या चाकावरुन परत फिरतो
मी अवसेच्या प्रवासाला!"

बुधवार, १४ ऑक्टोबर, २००९

मागणे



एवढा प्रकाश हे स्वयंप्रकाशी, मी
कधीच मागितला नाही तुझ्यापाशी;
मागितला असेल कधी जरासा,
अंतर्मनाचा वेध घेणारा एक कवडसा।
कदाचित एक काजवा
निबिडारण्याची भीती चीरण्यासाठी;
किंवा एक टिमटिमणारा दिवा
ऐलपैल सांधण्यासाठी।
पण येवढा?
सार्या अस्तित्वाला गुदमरवणारा?
कधीच नाही,
सूर्यालाही आंधळा करणारा ।

बुधवार, ७ ऑक्टोबर, २००९

पराभव





माझ्या पराभवाचा सत्कार आज आहे,
येणार वेदनेला आकार आज आहे...

आकाश जिंकल्याचा केला किती बहाणा,
कळले परि मनाला तो व्यर्थ माज आहे...

मृगजळात जल्लोषाच्या वाहून दूर गेलो,
पण मोल आसवांचे कळणार आज आहे...

किती वाजल्या दुन्दुभी, किती गाजले नगारे,
आता वेदनेतून सजणार साज आहे....

त्यांना हवे म्हणुनी फाटून ओठ हासे,
ह्या बेगडी जिण्याचा फुटणार ताज आहे...

मी जाहलो जगाचा, न राहिलो स्वता:चा, 
माझा फिरून मजला कळणार बाज आहे ...