सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

वाचन



झालं का वाचून?
नाही अजून...
झालं की कळेल
पान फडफडेल.
सहज सुटून
वाऱ्यावर उडेल...

- श्रीधर जहागिरदार
१५-१०-२०१८


गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

फुंकर



जखमा भरत नसतात 
पण म्हणून फुंकर घालायचीच नाही ?

वास्तू पाडून एक भक्कम भिंत 
उभारली गेली, रंगवली गेली 
लाईफ टाइम गॅरण्टीच्या संशयानं ... 

कोवळ्या पानांना पडू लागली   
भयग्रस्त स्वप्नं, रक्तचिंब लाल फुलांची,
आणि फुलांना खुपू लागले काटे 
निरागस वाऱ्यासंगे खेळताना ... 

एका सकाळी तुला घेऊन गेलेलो 
समुद्रावर, 
फारसं कुणी नव्हतं, एक निरागस एकटीच
मन लावून बनवत होती वाळू किल्ला.

"खेळ तिच्याशी"

मिनिटांत परतलिस, विचारलंस 
"ती त्यांच्यातली आहे, चालेल मी खेळली तर?"

"ही वाळू, 
हा समुद्र, 
हे आकाश, 
हा वारा. 
ते ठरवून खेळत नाहीत याच्याशी किंवा मग फक्त तिच्याशी. 
सारे देत असतात आनंद तुला, तिला  
तसाच निरागस आनंद देता  घेता यायला हवा तुला."

जखमा भरत नसतात
पण म्हणून फुंकर घालायचीच नाही ?
   
- श्रीधर जहागिरदार

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

मी तू





तू कां आहेस इतका अस्वस्थ? 
या वाढलेल्या गदारोळात 
तुझा गिल्ट वाढलेला असणार 

रडला होतास तू 
धुमसून धुमसून 
आणि मीच शांतवलं होतं तुला 
थोपटून थोपटून 

मधले सारे पूल वाहून गेलेत, आता 
तुझं तुलाच समजून घ्यावं लागणार 

नो म्हणजे नो असलं 
तरी हो म्हणजे होच असायला हवं 
हे मी तू समजून घेतलं होतं तेंव्हा.

समजून घेऊ आजही !!

-श्रीधर जहागिरदार