शुक्रवार, २२ मे, २००९

मोरपंखी क्षण

अनोख्या वेषात, फुलांच्या देशात जाणार तू,
रंगाची खैरात, गंधाच्या स्वरात गाणार तू।


क्षितिज कडा, स्वप्नांचा सडा घालणार तू,
ह्ळुवार जग, पायघडी ढग चालणार तू।


आकाश खुळा, आनंद झुला झुलणार तू,
मनाची कळी, पाकळी पाकळी फुलणार तू।


नाहीजरी थेंब, चांदण्यात चिंब भिजणार तू,
मोरपंखी क्षण, मोहरे कण कण सजणार तू।


अबोल हुंकार, स्पर्शाचा झंकार, डोलणार तू,
मनाची बोली, स्पर्शाची ओली, बोलणार तू।


पापणीत स्वप्न, जगण्यात मग्न, असणार तू,
आसुसली दिठी, बेभान मीठी, तुझी न रहाणार तू।

शनिवार, २ मे, २००९

अनुभूति


मेंदूवर सांचलेली वाळवंट
पसरताहेत हळूहळू मनापर्यंत ...

किती काळ जपशील चार थेंब
भावनांचे, ओसाड रेताडास फुटलाच, तर
फुटेल कोंब निवडुंगाचा अन
तुझ्या आत्म्याची लक्तरं
फडकावतील तुझ्या अपयशाची गाथा ...

पण ह्याची शक्यताही कमीच !
कारण कुठल्याही गाथेचा नायक
होण्याइतका मोठा नाहीस तू ...
ह्या वैराणात तुझी नियती शहामृगाची!

वादळाच्या वासाने खुपसून घे मान
तुलाच गिळणारया वाळवंटात,
तुझ्या अस्थिंचेही होऊ देत वाळू कण
अन जा सामावून ह्या वाळवंटात
त्याचाच एक भाग होउन !