शुक्रवार, ९ मार्च, २०१२

इथे असेच चालते...


दहशतीत जीवनाचे नित्य रुटीन चालते,

घालमेल वाढते ... इथे असेच चालते...

मोहाचे रतीब टीव्ही रोज नवे घालतो
मागण्या अनुषंगे ऐकणे मी टाळतो,
रुसवे नि फुगवे अन वादांचे फावते,
घालमेल वाढते ... इथे असेच चालते...

संपाचे अस्त्र कुणी नित्य इथे उपसते,
घाईच्या वेळेला नेमके खुपसते,
कामाला जाताना रोज असे धडधडते, 
घालमेल वाढते ... इथे असेच चालते...

एकतर्फी प्रेमाने चेहरे किती कुरुपती,
"लेक माझी वाढली", आईला धासती,
"तासाला फोन कर" सारखी बजावते,
घालमेल वाढते ... इथे असेच चालते...

रेव्ह पार्टी जंगलात पेपरात वाचतो,
पोराची वाट बघत रात्र रात्र जागतो,
चढे बिपी बायकोचे, शुगर माझी वाढते,
घालमेल वाढते ... इथे असेच चालते...

मन:शांती मिळण्याला होती कधी मंदिरे,
स्फोटांचे कुटील डाव आज  तिथे रंगले,
प्रार्थना करण्यास तिथे आज ना धजावते,
घालमेल वाढते ... इथे असेच चालते...

इथे कसाबी माणसांचे पीक रोज वाढते 
घालमेल वाढते ... इथे असेच चालते...
इथे अस्सेच चालते...   

- श्रीधर जहागिरदार 
२५.०२.२०१२  



२ टिप्पण्या: