सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

वाचनझालं का वाचून?
नाही अजून...
झालं की कळेल
पान फडफडेल.
सहज सुटून
वाऱ्यावर उडेल...

- श्रीधर जहागिरदार
१५-१०-२०१८


गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

फुंकरजखमा भरत नसतात 
पण म्हणून फुंकर घालायचीच नाही ?

वास्तू पाडून एक भक्कम भिंत 
उभारली गेली, रंगवली गेली 
लाईफ टाइम गॅरण्टीच्या संशयानं ... 

कोवळ्या पानांना पडू लागली   
भयग्रस्त स्वप्नं, रक्तचिंब लाल फुलांची,
आणि फुलांना खुपू लागले काटे 
निरागस वाऱ्यासंगे खेळताना ... 

एका सकाळी तुला घेऊन गेलेलो 
समुद्रावर, 
फारसं कुणी नव्हतं, एक निरागस एकटीच
मन लावून बनवत होती वाळू किल्ला.

"खेळ तिच्याशी"

मिनिटांत परतलिस, विचारलंस 
"ती त्यांच्यातली आहे, चालेल मी खेळली तर?"

"ही वाळू, 
हा समुद्र, 
हे आकाश, 
हा वारा. 
ते ठरवून खेळत नाहीत याच्याशी किंवा मग फक्त तिच्याशी. 
सारे देत असतात आनंद तुला, तिला  
तसाच निरागस आनंद देता  घेता यायला हवा तुला."

जखमा भरत नसतात
पण म्हणून फुंकर घालायचीच नाही ?
   
- श्रीधर जहागिरदार

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

मी तू

तू कां आहेस इतका अस्वस्थ? 
या वाढलेल्या गदारोळात 
तुझा गिल्ट वाढलेला असणार 

रडला होतास तू 
धुमसून धुमसून 
आणि मीच शांतवलं होतं तुला 
थोपटून थोपटून 

मधले सारे पूल वाहून गेलेत, आता 
तुझं तुलाच समजून घ्यावं लागणार 

नो म्हणजे नो असलं 
तरी हो म्हणजे होच असायला हवं 
हे मी तू समजून घेतलं होतं तेंव्हा.

समजून घेऊ आजही !!

-श्रीधर जहागिरदार

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

ते खरे ...

हे खरे की ते खरे?
खोल बोचे, ते खरे ...
आश्रयाला घर जरी
भय तिचे असते खरे ...
भूक जेंव्हा जाळते
भान हे सुटते खरे...
भुर्र होती पाखरे
झाड मग थकते खरे !
हो म्हणू की.. नो तिला?
नेहमी चुकते खरे !!
मोगरा हसतो जरी
रात्र रडते ते खरे...
- श्रीधर जहागिरदार

गुरुवार, २६ जुलै, २०१८

नेमका मी आहे कुठे?

नेमका मी आहे कुठे?
मी प्रवाही झालो कुठे !

सोडल्या मी वाटा जुन्या 
पण नव्याने जाऊ कुठे? 

पाखरांचा उडला थवा
झाड गाते शोधू कुठे? 

दु:ख गेले हरखून.. मी
आसवांना वळवू कुठे?

धाक ठेवी, शिस्तीत जी  
ती मुठीची काठी कुठे? 

आठवावी आई मला
शोधताना लाडू कुठे !

जात माझी 'माणूस' हे 
सांगणारा नाही कुठे !

- श्रीधर जहागिरदार 
२६ जुलै २०१८

सोमवार, २३ जुलै, २०१८

पाऊस आहे

मनाच्या सांदीत गोळा पाऊस आहे 
तरीही शब्दांत कोरा पाऊस आहे...

घराला वेढून असता पाणी पुराचे 
कसे मी सांगू जरासा पाऊस आहे ?

नको राखू चालताना खोटा दुरावा   
जरा सच्चे वाग आता,पाऊस आहे... 

असे वणवा ठासलेला अफवेत एका 
जळू द्या रे! सांत्वनाला पाऊस आहे...   

बघा, ज्यांनी पेरले रस्त्यातून खड्डे   
अहवाल त्यांचा सांगतो पाऊस आहे !

तयारी सारीच केली होती यमाने  
म्हणे रेडा,येत नाही! पाऊस आहे...

  - श्रीधर जहागिरदार 
२३ जुलै २०१८  

गुरुवार, १४ जून, २०१८

पाऊस लहानपणीचा


आल्या आल्या धिंगाणा
पत्र्यावर घालत होता
पागोळ्यातून धावत धावत
बादलीतुन भरला होता ….वर्गामध्ये शिकण्यासाठी
कौले टाळून तो शिरला
डोक्यामध्ये माझ्या काय
होता मग शोधत बसला ……

मधेच दडला ढगाआड अन 
मोठ्यांदा तो ओरडला
आजोबांची झोप मोडता
हमशाहमशी तो रडला ….

- श्रीधर भगवान जहागिरदार