मंगळवार, ६ मार्च, २०१८


१. मला वाटले कि जपावे उन्हाला….
 जसे वाटते कि जपावे सुखाला
 जीवाहून प्रिय माझ्या सख्याला ….

नहाता नहाता कोमट उन्हात
 पहाता पहाता सुख ये भरात
 तरी हात माझा कसा हा तमात ?

उन्हातून दूर किती सोबतीला;
 सारेच बंदी अपुल्या तमात !
जरा ऊब मिळता समाधान त्यांना
 जणू पूर्ण ऊन आले कह्यात !

 जराशी तिरीप येता, मलाही आलेसे वाटे
 उन्ह संपूर्ण सारे लावूनी दारे
त्या बंदिस्त करता झाले मीच बंदी
मला हे कळाले !

मूळ कविता : स्वरांगी साने भावानुवाद : श्रीधर जहागिरदार २.
 आलंच मनात, उन्हाचा आल्हाद अल्लद धरावा हातात तसाच जसे हव्याशा सुखाला जीवाच्या सख्याला …
त्याच्या कोवळ्या ऊबेत होताना सुस्नात, येत राहिले हाताशी तुकडे काळोखाचे !
सोनसावळ्या उन्हापासून लांब बरेचजण होते माझ्या सहवासात सारेच कैद आपापल्या काळोखात उबेलाच गोंजारत राहिलेले अख्खे ऊन समजून …
मीही तशीच, फटीतून डोकावणाऱ्या कवडशालाच मानून बसले अख्खे ऊन आणि करावे बंदिस्त त्याला म्हणून मिटून टाकली ती फट … आणि उमगले ऊन नाही, पण मीच झाले होते बंदी !!
मूळ कविता : स्वरांगी साने अनुवाद : श्रीधर जहागिरदार
मूळ हिंदी कविता अपना अपना अँधेरा ******************** मैंने चाहा धूप को पकड़ना वैसे ही जैसे कोई चाहे सुख को या अपने प्यारे दोस्त को . मैं नहाती रही गुनगुनेपन में उसके और टोहती रही अंधेरा धूप से दूर मैं कई लोगों के साथ थी सभी अपने अपने अंधेरे में कैद ज़रा सी आँच को मान रहे थे पूरी धूप मैंने भी झिरी से आती धूप को पूरी समझा और बंद कर किवाड़ सोचा बंद हो गई वह जबकि धूप नहीं बंद थी मैं।

जाणीव



अथांग झाल्या डोह मनावर
होडी बनुनी शैशव माझे 
कधी हळहळते, कधी डुचमळते
तरंग उठवित जलपृष्ठावर 
अथांगतेला मर्यादांची 
अलगद जाणीव देते !

सोमवार, ५ मार्च, २०१८

मी मौन पाळले होते


मी मौन पाळले होते
*****************

तू सत्य गाळले होते 
मी मौन पाळले होते...

रात्रीच येत सामोरे  
जे प्रश्ण टाळले होते...

संपूर्ण वाचले कोणी  
संदर्भ चाळले होते....

प्रारब्ध मांडले जेथे   
ते पर्ण वाळले होते ....

पुष्पें नकोस तू शोधू    
मी दु:ख माळले होते... 

हा गंध कोठुनी आला ? 
ते पत्र जाळले होते !

झालीच 'झाड' तू जेंव्हा  
'हे' भूत भाळले होते !

- श्रीधर जहागिरदार 
०६-०३-२०१८