बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

भलती घबाडे




खंगलेली सारीच झाडे 
पोपटांची झाली गिधाडे ... 

तंत्र येथे चाले प्रजेचे
रोज मोर्चे आणीक राडे ... 

टेंडरांनी गिळलेत रस्ते 
खिळखीळी झालीत हाडे.... 

दाखवाया उत्पन्न शेती   
पेरलेली भलती घबाडे !... 

बंगले जे बळकावलेले     
तुंबलेले त्यांचेच भाडे .... 

पांखरांचे येती थवे ना  
पारध्यांच्या कब्जात वाडे ... 

- श्रीधर जहागिरदार 
१२-१०-२०१६

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

कोण आले संगतीला



कोण आले संगतीला, 
कोण बसले पंगतीला

गंध नक्की मोगऱ्याचा, 
कोण होते सोबतीला?

प्रेम करुणा दोष झाले, 
परवडेना ऐपतीला 

सावल्यांचे राज्य येता
अंत नाही दुर्गतीला ... 

रोज वाजे द्वेष डंका,
बांसरी जपते मतीला 

पेंगला  वाटे क्षणी त्या
दाद देतो हरकतीला ...

जन्म पुढचा दे हवा तर 
आज मृत्यू शाश्वतीला .. 

-श्रीधर जहागिरदार .

 ६ ऑक्टोबर २०१६