बुधवार, ७ डिसेंबर, २०११

बेवारशी आत्मा

७ डिसेंबरच्या रात्री, हड्डी-फोडांच्या बैठकीत
ओरपत असता गोबी बटाट्याचा रस्सा,
आला एक कुजका बटाटा,. म्हणाला:
"मी आत्मा आहे!"

मी निश्चिंतपणे ढकलला त्याला पाण्याबरोबर पोटात,
कारण तो आत्मा माझा नव्हता!


मी, आत्माविहीन माणूस, घेऊन हिंडतो एक
चालतं बोलतं कलेवर!
पण मी नक्कीच गिळला असला पाहिजे,
एक आत्मा, कुजका! कारण
आत्मा असतो सत्यवादी, निदान
शरीराबाहेर असताना तरी!

ही  समोर बसलेली सारी
सन्माननीय, प्रबुद्ध, श्रीमंत मंडळी,
हा आत्मा त्यांचा असण शक्य नाही;
त्यांचा आत्मा असा वाऱ्यावर सोडलेला नसतो.
कडव्या मद्यात कलेवर बुडवण्याआधी 
ठेऊन येतात ते आपला आत्मा सुरक्षीत,
आपल्या घरातल्या फ्रीज मध्ये!

मग हा आत्मा कुणाचा?
कि बिजागर ढिली झालेल्या दाराच्या फटीतून
शिरलाय, बाहेरच्या मिट्ट अंधारात
स्वैर संचारणारा एक प्रेतात्मा?
पण ह्या बैठकीत आत्म्याला मज्जाव आहे, कारण
आत्म्याला विवेक असतो,
आत्म्याला संयम असतो,
आत्म्याला असतो सारासार विचार.
आत्मा घाबरतो श्रद्धेला,
आत्मा घाबरतो देवाला,
म्हणून तर टांगली गुरुदेवाची  तसबीर भींतीला!
नो एन्ट्री तू प्युअर होली सोल्स !

'गुरुजींचा खास' सल्ला घेऊन धुंदीच वारं
पितात, ही अत्माविहीन कलेवर,
अन पेटून उठतात, प्राशून
इंद्रधनुषी फेसाआड दडलेली कडवी आग.
कुजलेला बटाटा स्वस्थ नसतो,
माझ्या पोटात ढवळत असतं,
मेंदूत धुंदीच वारं शिरत असतं,
येते अचानक कुजक्या बटाट्याला जाग;
"मी आत्मा आहे! मी आत्मा आहे!"
बेदरकारपणे तो ओरडतो.

आत्म्याला निषिद्ध
बैठकीत, आत्म्याचा आवाज ऐकून,
धुंद कलेवर होतात क्षुब्द्ध !
" हु अलौड धिस डर्टी सोल हिअर ?"

शांत असतात तसबिरीत बसलेले गुरुदेव,
त्यांच्या जवळ लावलेली उदबत्ती असते विझलेली.

सुरु होतो मग आत्म्याचा शोध,
आपापले आत्मे घरातल्या फ्रीज मध्ये सुरक्षीत ठेऊन
एका अपरिचित   बेवारशी आत्म्याचा शोध.
हा आत्मा कुणाचा? कसा आला? कुठून आला?
अनुत्तरीत प्रश्नांच्या परावर्तनातून समस्या उठते
ह्या आत्म्याच करायचं काय?


दोन आत्मे सांभाळण्याची ताकद नसलेली
ती कलेवर एकमताने ठरवतात,
तो आत्मा मला बहाल करायचा!
"तू आत्माविहीन माणूस, एक आत्मा जड नाही!"

तेव्हा पासून मी घेऊन हिंडतोय, माझ्या कलेवरात
त्या बेवारशी कुजक्या आत्म्याच ओझं ;
ते ओझ मला झुगारायाचय , कुठलीही किंमत
घेऊन, हवी तर देऊन! पण तो आत्मा
मला विकायचाय. हवा त्याने घेऊन जावा,
भाड्याने किंवा फुकट,
पण हा आत्मा सांभाळण मला शक्य नाही,
कारण वेळोवेळी काढून आत्मा
सुरक्षीत ठेवायला माझ्या घरात फ्रीज नाही!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा