मी एक झाड पाहिले, शब्दांनी रसरसलेले , मातीतून उगवून आठवणींच्या, आकाशाला भिडलेले ..
मंगळवार, ६ मार्च, २०१८
सोमवार, ५ मार्च, २०१८
मी मौन पाळले होते
मी मौन पाळले होते
*****************
*****************
तू सत्य गाळले होते
मी मौन पाळले होते...
रात्रीच येत सामोरे
जे प्रश्ण टाळले होते...
संपूर्ण वाचले कोणी
संदर्भ चाळले होते....
प्रारब्ध मांडले जेथे
ते पर्ण वाळले होते ....
पुष्पें नकोस तू शोधू
मी दु:ख माळले होते...
हा गंध कोठुनी आला ?
ते पत्र जाळले होते !
झालीच 'झाड' तू जेंव्हा
'हे' भूत भाळले होते !
- श्रीधर जहागिरदार
०६-०३-२०१८
रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८
सल
सल
***
तुला ठाऊक असेल का ?
उमलत्या वयात मी दाखवलेला
समंजसपणा ...
आणि त्यानंतर घडत गेलेल्या
आपल्या तुरळक भेटीत
तू दाखवलेला निर्विकारपणा ;
वाढतच गेलाय मनात कुठलासा सल !!
अशातच आठवलं
एकदा वहीत तू लिहिलेलं
" तुला न प्राजक्त समजलाय, न बकुळी "
हा सल .... प्राजक्ताचा की बकुळीचा?
- श्रीधर जहागिरदार
२५-०२-२०१८
२५-०२-२०१८
शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८
सैरभैर
सैरभैर
*******
पानगळीला सुरुवात झाली
कि मन सैरभैर व्हाव पानगळीला सुरुवात झाली
दडपण असायचं,
पायरी पायरीवर द्याव्या लागणाऱ्या.
अवघ्या अस्तित्वाला भेदून जाणाऱ्या
एकेक प्रश्नाचं ...
आयुष्यातली अवघड गणितं सोडवून घ्यायला
येत असे मग तुझ्याकडे.
नव्या पालवीने आलेला आत्मविश्वास
मग पुरायचा पुढील तीन ऋतू ……
..
अचानक वाटा बदलल्या
अंतर वाढलं
आणि उत्तरंही ..
तुझं मला सांगणं :
पालवी भेटेलच
याची खात्री नाही आता !!"
- श्रीधर जहागिरदार
१३ फेब्रु २०१४
मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७
वेशीपाशी रहाताना
वेशीपाशी रहाताना
जगता येत नाही स्वस्थपणे...
दोन्ही कडून येणारे वारे
वाहून आणतात धूळ
द्वेष भरल्या दहशतीची !...
जगता येत नाही स्वस्थपणे...
दोन्ही कडून येणारे वारे
वाहून आणतात धूळ
द्वेष भरल्या दहशतीची !...
वेशीपाशी राहणाऱ्याला असते
निश्चित अशी एकच ओळख
संशयिताची,
आणि ती कायम ठेवण्याचा
खटाटोप दोन्ही कडून !...
निश्चित अशी एकच ओळख
संशयिताची,
आणि ती कायम ठेवण्याचा
खटाटोप दोन्ही कडून !...
वेशीपाशी राहणाऱ्यांचा
इतिहास असतो पिढ्यापिढ्यांचा,
इकडच्या आणि तिकडच्या सोयीने
वेळोवेळी लिहिलेला;
इतिहास असतो पिढ्यापिढ्यांचा,
इकडच्या आणि तिकडच्या सोयीने
वेळोवेळी लिहिलेला;
मात्र नसतो त्यांचा आपला भूभाग
सुईच्या अग्रा इतकाही
चुंबून नमन करायला !
- श्रीधर जहागिरदार
रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७
अखेर
वीसेक हिरवीगार रानं
पाच पंचवीस खळाळत्या नद्या
सातेक लहान मोठे डोंगर
पार करून अखेर पोहोचलो
अमर्याद वाळवंटात ...
तिथे पाहिला एक पारदर्शक विदूषक
सूर्याच्या सावलीत, नृत्यमग्न झालेला ...
माझ्या कोरड्या जिभेवर त्याने टाकले
चार थेंब डोळ्यातले
आणि भाजलेल्या वाळूचे चटके चुकवताना
मीही दिसू लागलो नृत्यमग्न ,
आणि पारदर्शक ...
मृगजळाचा साक्षात्कार झाल्यासारखा !
- श्रीधर जहागिरदार
बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)