गुरुवार, २४ जुलै, २०१४

नाते



होडीस ना कळावे डोहास काय छळते
स्थितप्रज्ञ शांत वरुनी अंतस्थ काय सलते …

वाऱ्यास का नसावा थारा कुठे जरासा
प्रश्नास ह्या धरुनी हलकेच पान हलते …

"स्पर्शेन आज नक्की " विश्वास ये कुठूनी
आकाश शोधण्याला खग रोज उंच उडते …

लाभे खरा ज्वलंत प्राणातला निखारा
श्वासातले धुमारे जपण्यात वेळ खपते ….

मातीत राख विरता उमलून फूल यावे
डोहास थेंब सांगे "नाते असेच असते  "…


- श्रीधर जहागिरदार
२४ जुलै २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा