सोमवार, २० जानेवारी, २०१४

माझी कविता



शून्यमनस्का 
विस्कळीतशी 
तारांबळीत
अर्थ सांडते  
तरी असोशी 
धरून असते 
कर्मयोगिनी 
माझी कविता …… 

आशयकारी 
आभाळातील 
शब्द चांदण्या 
उल्कापाती 
विस्मयकारी 
पांडित्याने  
भेदरणारी 
माझी कविता…. 

कभिन्न रात्री 
हताश होता 
डोहा काठी
मला दिसावी 
तमास चिरत्या   
पणती जैसी 
टिमटिमणारी 
माझी कविता…. 

दंवात न्हाली
प्रसन्नवदना 
पहाटलेली 
शुभ्र शूचिता
देवळातल्या
घंटे सोबत 
निनादणारी  
माझी कविता …. 

अंतर्नादी 
कुजबुजणारी 
लाडवलेली 
हट्टी जिद्दी 
परिष्कृत हो  
सालंकृत हो  
अर्थवाहिनी 
माझी कविता !


श्रीधर जहागिरदार 
२१जाने २०१४ 

शनिवार, १८ जानेवारी, २०१४

ओंजळ


पारिजातकाची फुलं 
सांडावीत भुईवर,
तसा कवितांचा 
सडा  ....
मी 
वेचत असतो,
ठेवत असतो,
अलगद ओंजळीत 


माझ्याच 
उबेने कोमेजतात 
अर्थ कांहींचे,
काही मावत नाहीत 
इवल्या ओंजळीत !!

- श्रीधर जहागिरदार 
१९ जाने २०१४