सोमवार, १८ मार्च, २०१३

कातरवाट

परीट घडीच्या मनावरती
कातरवेळची काजळी
सांदी कोपरी दडून बसले
आठव जुने वटवाघुळी … 


हिंदकळणारी, फडफडणारी
अजस्त्रपंखी कर्कशा
लक्तर लक्तर पिंजून निघते
भावनांची दुर्दशा  …

रंगीत क्षितीजापलीकडे
अंधाराचा हा घसा
इवला इवला होऊन जाई
भेदरलेला शुभ्र ससा  ….


आकांताने रोज चुकावी
त्रिशंकूची कातरवाट  … 
नवी क्षितिजे घेऊन येईल
कुणी सांगावे नवी पहाट  !

 - श्रीधर जहागिरदार
(१९७०) 

सोमवार, ४ मार्च, २०१३

आभाळ

आभाळ इथपासून तिथपर्यंत
एका खिडकीत मावत नाही,
ज्याला त्याला वाटत असत:
आपल्या खिडकीतल तेवढच सच्च !
आपली खिडकी सोडत नाही,
दुसऱ्या खिडकीत जात नाही …

खिडकी असते भिंतींमध्ये
भिंत उभी मनामध्ये 
मन वसते माणसामध्ये
माणस सारी घरामध्ये 
घराभोवती पुन्हा भिंती
भिंतीमध्ये असते खिडकी
खिडकी मधला आभाळ तुकडा
थोडा सरळ, थोडा वाकडा  !

कधी कळणार
तुकडा म्हणजे आभाळ नाही ?

आभाळाच्या गोष्टी करायला
'तुझ माझ' सोडून, अख्ख्या
आभाळाला भिडायला हवं
भिंती मोडून किंवा घर सोडून
सरळ आभाळाखाली यायला हवं

येशील?



- श्रीधर जहागिरदार
५-३-२०१३

माणसांची हद्द झाली

माणसांची हद्द झाली
धर्म ही सरहद्द झाली …

घेउनी  मुख्त्यारनामा
बघ खुदा ही खुद्द झाली ...

स्वार्थ तो चलनात येता
प्रेम नाणी बद्द झाली …

तख्तपोशी मान्य होता
दोष कलमे रद्द झाली …

झोडता चौकात 'श्री'ला
खूष ती बेहद्द झाली …




- श्रीधर जहागिरदार
४-३ -२०१३