शुक्रवार, २६ ऑक्टोबर, २०१२

आज माझ्या वेदनेला




भोवताली पेटलेले वेदनेचे रान हे
आज माझ्या वेदनेला सारले बाजूस मी ...
++++++++++++++++++++++++
आज माझ्या वेदनेला झाकणार नाही
दाटता डोळ्यात अश्रू, लाजणार नाही ...

जीवनाला पाखडूनी घेतले कुणी का ?
दु:ख फेका, सौख्य ठेवा, चालणार नाही...

मी किनारा ठेवतो, तू वादळे तुझी ने
सांगुनी नौकेस ऐसे भागणार नाही...

रोज माझी बाग फुलवी वेगळी कहाणी
फूल मी जुन्या व्यथेचे, माळणार नाही...

कोंडलेल्या हुंदक्यांचे बंड झाले सुरु
सांत्वनाने बेगडी "श्री " हारणार नाही...

- श्रीधर जहागिरदार
२७-१०-२०१२


शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१२

उत्तरायणातील द्विपदी



मधुमास तुझे सरले आता, सरू दे,
'मधु' मुरला ग रक्ती माझ्या, मुरु दे ...
**
सळसळ माझी रक्तामधली शमली,
रक्त दाब मग तुला कशाने, कळू  दे...
**
"तुझ्या कुंतली झरे चांदणे.." म्हणता
"चांद उगवला तुझ्याही माथी", म्हणते..
**
तुझ्या विभ्रमी रमलो श्रम ना दिसले,
विसाव आता पाय जरा मज चुरू दे..
**
"वहीतला तो गुलाब सुकला, कुठला??"
"साभार" तुझी कविता कुठली! कळू दे.!!"
**
"सो.ड.. हात ना .. भवती सारे.. " ...स्मरते?
"किती ग गर्दी...!!"  "हात तुझा मज धरू दे.."
**
जिंकलो किती डाव एकटा, खुपते
अता जिंक तू, मला एकदा हरू दे.
**
दोन आपली पिले बोलवी दोघा
चिमणा कोठे, कोठे चिमणी, ठरू दे..

- श्रीधर जहागिरदार 
१९-१०-२०१२

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२

चुकते...

रीत चुकते
प्रीत चुकते ...
शब्द हुकता
गीत चुकते...

मद्य चढता
चाल चुकते..
मोह पडता
हीत चुकते...


रोज लाथा !
काय चुकते?
पाठ उत्तर
भीत चुकते...

मुद्दलाचे
व्याज चुकते!
रोज शाळा
फीत चुकते..

माणसाचे
हेच चुकते
मोजताना
वीत चुकते ...

- श्रीधर जहागिरदार 
११-१०-२०१२

ठाउक नाही....


आलो होतो काय योजुनी, ठाउक नाही
जातो आहें काय जोडुनी, ठाउक नाही....

कशास करता हेवा माझ्या सौभाग्याचा
सोने निघते कसे भाजुनी ! ठाउक नाही ?

तुझे प्रेम जणु कट्यार होती, खूप नशिली
कसे न कळले घाव होउनी, ठाउक नाही...

गाडी, माडी, नोकर, चाकर, भक्कम सारे,
जाती कां मग मुले टाळुनी, ठाउक नाही...

रदबदलीचा धंदा हल्ली तेंजित आहें,
किती घेतले दाम मोजुनी, ठाउक नाही...

वेशी पाशी संन्याशाची घुटमळ झाली,
कोण चालले दिवा लावुनी, ठाउक नाही...

मुक्कामाला जो तो चटकन उतरून गेला
'श्री' कां बसला जागा धरुनी, ठाउक नाही...


- श्रीधर जहागिरदार
११-१०-२०१२



सोमवार, १ ऑक्टोबर, २०१२

आरसा मुखवट्यास बधलाच नाही


आरसा मुखवट्यास बधलाच नाही
आज तो आरशात दिसलाच नाही ...

खूप झाले आर्जव आता फुलांचे
गंध कोषात ज्यांच्या उरलाच नाही...

वेदना भटके विवस्त्र, असहाय ती,
माणसांनी गाव हा वसलाच नाही...

धावला जोमात ज्याला पाय नाही,
मी करंटा कण्हतो "चपलाच नाही"...

काय "श्री"चे काम मैफिलीत सांगा
लिहीतो गझल जिला मतलाच नाही...



- श्रीधर जहागिरदार
०१-१०-२०१